(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Pakistan : पाकिस्तानच्या गोलंदाजांना शिंगावर घेण्याची हीच वेळ, टीम इंडियाला सुनंदन लेलेंचा सल्ला
India vs Pakistan : आशिया चषकात इतर कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही, पण भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय.
India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ काही औरच असते. चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून सुपर 4 च्या या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आशिया चषकात इतर कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही, पण भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी आणि भारताची फलंदाजी, हा सामना रंगतदार होणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी एबीपी माझाला दिलेली माहिती पाहूयात...
शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी असेल. साखळी सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान तिकडीने भारताच्या 10 फलंदाजांना बाद केले होते. याचा बदला भारतीय फलंदाज रविवारी घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे, तिन्ही गोलंदाज वेगवेगळ्या धाटणीचे आहेत.
2 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी सामन्यात भारताच्या दहाही विकेट पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. शाहीन, हॅरिस आणि नसीम या तिन्ही गोलंदाजांची शैली वेगवेगळी आहे. त्यामुळेच प्रत्येकवेळा भारतीय फलंदाजांची त्यांच्यापुढे परीक्षा असते. आता भारतीय फलंदाजाकडे आरे ला कारे करण्याची वेळ आहे. पाकिस्तानच्या वेगवान तिकडीला शिंगावर घेण्याची वेळ आलेली आहे. बोलणं सोपं पण करणं कठीण... अशी गोष्ट आहे. पण भारतीय संघाकडे मोठा अनुभव आहे. त्या जोरावर भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या वेगवान तिकडीला प्रत्युत्तर देतील, अशी आशा आहे.
पाकिस्तानविरोधात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या केएल राहुल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. मोठ्या सामन्यात, दडपणात कशी फलंदाजी करायची, याचे उत्तर इशान किशन याने पाकिस्तानविरोधात दिले होते. आता केएल राहुलची वेळ आहे. विश्वचषकासाठी केएल राहुल टीम इंडियाचा नंबर 1 विकेटकीपर आहे. केएल राहुलसोबतच रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना पाकिस्तानविरोधात प्रभावी आणि चमत्कारी कामगिरी करण्याची वेळ आहे. भारतीय फलंदाज सुरुवातीला पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे दचकतात, अडखळतात.
कोलंबोमध्ये रविवारी ढगाळ वातावरण आहे. पावासाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी रंगाचा बेरंग होऊ नये, त्यासाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. आर. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्ड वेगवान आहे. त्यामुळे दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असतील. पाकिस्तानविरोधात रविवारी होणारा सामना भारतासाठी सुपर 4 चा पहिला आणि महत्वाचा असेल. कारण, श्रीलंका आणि बांगलादेशविरोधात भारत सहज विजय मिळवू शकतो. पाकिस्तानविरोधात झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात काय होणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.