Ind Vs SL, Team Announcement : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का
Ind Vs SL : रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकाविरोधातील कसोटी संघाची निवड करताना चार अनुभवी खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
श्रीलंकाविरोधात कसोटी आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी निवड झाली. टी-20 मालिकेतून ऋषभ पंत आणि विराट कोहलीने आराम घेतला आहे. कसोटीमध्ये दोघांचीही निवड झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामगिरीत सातत्या न राखणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मालाही वगळण्यात आले आहे. तसेच वृद्धीमान साहालाही संघातून डच्चू देण्यात आला आहे.
'भारताने अधिकृतपणे बदलाच्या दिशेने पावले उचलली आहे. भविष्यातील तयारीसाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. कसोटी संघात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांची निवड करण्यात आलेली नाही. आता हनुमा विहारी, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्याची वेळ आली आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि साहा यांना रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही कुणाचेही दरवाजे बंद केलेले नाहीत. धावा करा, विकेट घ्या, पुन्हा संघात संधी मिळेल. मला आशा आहे की, चारही अनुभवी खेळाडू दणक्यात संघात पुनरागमन करतील, असे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी संघाची घोषणा करताना सांगितले.
आधी उपकर्णधारपद गेले, आता संघातून बाहेर
मागील एक वर्ष अजिंक्य रहाणेसाठी खूपच संघर्षपूर्ण राहिले आहे. 2021 मध्ये 33 वर्षीय अजिंक्य रहाणेला फक्त 479 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळेच रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. आता कसोटी संघातूनही डच्चू देण्यात आला आहे.
पुजारा नावाची भिंतही खचली -
2021 मध्ये चेतेश्वर पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 14 कसोटी सामन्यात पुजाराला 28 च्या सरासरीने फक्त 702 धावाच करता आल्या. यादरम्यान पुजाराला एकही शतक झळकावता आले नाही. सहा अर्धशतके झळकावली आहे. पुजाराचा स्ट्राईक रेट फक्त 34 इतकाच राहिला आहे. खराब स्ट्राईक रेटमुळे पुजाराला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला होता.