IndW vs SLW, 2nd ODI : भारतीय महिलांचा श्रीलंकेवर दांडगा विजय, 10 विकेट्सनी जिंकला सामना, मंधानासह वर्माची ऐतिहासिक कामगिरी
IND vs SL Womens : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.
SL vs IND : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अतिशय दमदार विजयाची नोंद केली आहे. तब्बल 10 विकेट्सनी सामना जिंकत भारताच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना जोडीने एक नवा रेकॉर्डही केला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 174 धावा पूर्ण करताना भारतीय महिलांकडून सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप या दोघींनी उभारली. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. आधी टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिकाही खिशात घातली आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक पार पडली. भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. निर्णयाप्रमाणे भारतीय महिलांनी भेदक गोलंदाजी करत 172 धावांवर श्रीलंकेच्या महिलांना सर्वबाद केलं. श्रीलंकेकडून अमा कंचनाने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंहने सर्वाधिक 4 तर मेघना सिंह आणि दिप्ती शर्मा यानी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
10 विकेट्सनी भारत विजयी
174 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या भारतीय महिलांनी केवळ 25.4 षटकातच विजय मिळवला. यावेळी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा जोडीने तुफान अशी नाबाद 174 धावांची भागिदारी उभारली. यावेळी मंधानाने 83 चेंडूत 91 तर शेफालीने 71 चेंडूत 71 धावा करत आव्हान पूर्ण केलं. ज्यामुळे तब्बल 10 विकेट्सनी भारताचा विजय झाला. रेणुका सिंहच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे तिला प्लॅअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.
टी20 मालिकेत विजय
डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकात 104 धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघान टी-20 मालिकेवर 2-0 नं कब्जा केला. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 126 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पाच विकेट्स राखून सामना जिंकला. तिसरा सामना मात्र श्रीलंकेने जिंकला होता. या सामन्यात सर्वात आधी भारतीय महिलांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. 20 षटकात 138 धावाच स्कोरबोर्डवर लागल्या. या धावा श्रीलंकेनं चामिरा अथूपट्टूच्या दमदार नाबाद 80 धावा केल्या. तिच्याच जोरावर संघानं 17 षटकात तीन गडी गमावत विजय मिळवला.
हे देखील वाचा-
- Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : भारताचा दुसरा डाव आटोपला, इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य
- ENG vs IND: पहिल्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल, व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
- ENG vs IND: 'भारतानं कितीही धावसंख्या उभारली, तरी आम्ही...' जॉनी बेअरस्टोनं सांगितला इंग्लंडचा पुढचा प्लॅन