(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India : दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी रोहित शर्मा डाव टाकणार, हुकमी एक्का मैदानात उतरवणार? श्रीलंकेची कोंडी करण्यासाठी विशेष प्लॅन
Team India : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी वनडे मॅच उद्या होणार आहे. दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी रोहित शर्मा आणि भारतीय संघाला विशेष रणनीती राबवावी लागणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच ड्रॉ झाली आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 230 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ या सामन्यात विजयापासून एक पाऊल दूर राहिला. भारताच्या संघ 230 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या सामन्यात विजयाची संधी हुकल्यानंतर दुसऱ्या मॅचसाठी भारताच्या संघानं विशेष रणनीती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ उद्या श्रीलंकेविरुद्ध दुसरी वनडे मॅच खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मॅच ड्रॉ झाली होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं 75 धावांची सलामीची भागिदारी केली होती. श्रीलंकेनं यानंतर कमबॅक करत मॅच ड्रॉ करण्यात यश मिळवलं. भारताला विजयासाठी 1 रन हवी असताना दोन विकेट हाती होत्या. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं दोन विकेट घेत मॅच ड्रॉ करण्यात यश मिळवलं. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या नऊ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाला केवळ एक विकेट मिळाली.
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी धिम्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या नऊ विकेट घेतल्या. तर, भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 30 ओव्हर टाकत 4 विकेट घेतल्या. रोहित शर्मा आणि भारतीय संघाच्या थिंक टँकला दुसऱ्या वनडे मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांचा योग्य प्रकारे सामना करावा लागणार आहे.
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीवर आक्रमण
श्रीलंकेच्या चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे यांनी पहिल्या वनडेत भारताच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे यांच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं आव्हान भारतासमोर असेल. श्रीलंकेच्या फिरकीपटूंची लय बिघडवण्यासाठी रिषभ पंत किंवा रियान पराग यांना देखील संधी दिली जाऊ शकते. रिषभ पंत आणि रियान पराग हे श्रीलंकेच्या फिरकीपटूंची लय बिघडवण्यासाठी आक्रमक फलंदाजी करु शकतात.
रोहित शर्मा शिवाय इतर फलंदाजांना पहिल्या मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळं दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांना देखील गोलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केली त्याप्रमाणं दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरावं लागेल. धिम्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांना रोखणं हे भारतापुढील सर्वात महत्त्वाचं आवाहन असेल.
संबंधित बातम्या :