रिंकू सिंग- सूर्यकुमार यादवनं गेलेली मॅच खेचून आणली, अखेर मॅच ड्रा, सुपर ओव्हरचा थरार रंगणार
IND vs SL : भारतानं श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी 20 मालिका जिंकली आहे.
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरी मॅच पार पडली. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 137 धावा केल्या. शुभमन गिल(Shubman Gill), रियान पराग (Riyan Parag) आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 137 धावा केल्या. भारतानं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा या तिघांनी चांगली खेळी केली. मात्र, त्यानंतर भारतानं कमबॅक केलं. भारतानं 12 बॉल 9 धावा गरजेच्या असताना रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवनं केवळ 8 धावा देत 4 विकेट घेतल्या यामुळं मॅच सुपर ओव्हरमध्ये पोहोचली.
भारताकडून 20 ओव्हरमध्ये 137 धावा
भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या जोडीनं केली. यशस्वी जयस्वालनं दुसऱ्या टी 20 मॅच प्रमाणं आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बाद झाला आणि भारताची विकेट गमावण्याची मालिका सुरु झाली. यशस्वी जयस्वालनं 10 धावा केल्या. यानंतर रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन दमदार कामगिरी करु शकले नाहीत. संजू सॅमसन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे 13 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताचा डाव शुभमन गिल, रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सावरला. शुभमन गिलनं 39, रियान पराग यानं 26 आणि वॉशिंग्टन सुंदरनं 25 धावा केल्या. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 137 धावा केल्या.
प्रयोग करणं महागात पडलं
भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकले होते. तिसऱ्या मॅचमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रयोग केले. चार खेळाडूंना विश्रांती दिली. हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली. खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली होती.
श्रीलंकेला 3 ओव्हरमध्ये 21 धावांची गरज असताना सूर्यकुमार यादवनं खलील अहमदला गोलंदाजी दिली. खलील अहमदनं त्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये त्यानं पाच वाईड बॉल टाकले.
भारताचा संघ
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद
श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंडू मेंडिस, चरिथ असालंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तिक्षाना, मथिशा पथिराना आणि असिथा फर्नांडो
संबंधित बातम्या :