IND vs SA : सॅमसनला आणा, 'या' फलंदाजाला बाहेर काढा, दुसऱ्या टी 20 मॅचअगोदर आर. अश्विनच्या वक्तव्यानं खळबळ
Ravichandran Ashwin on Sanju Samson India Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना न्यू चंदीगडमध्ये होणार आहे. त्यापूर्वी आर. अश्विनच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे.

न्यू चंदीगड : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिली टी 20 मॅच कटक येथे झाली होती. ज्यात भारतानं 101 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, संजू सॅमसन तेव्हापासून चर्चेचा विषय ठरला आहे. संजू सॅमसनला पहिल्या टी 20 मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. जितेश शर्माला विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली होती.
संजू सॅमसननं काही सामन्यांमध्ये भारताकडून सलामीला फलंदजी केली आहे. काही डावांमध्ये त्यानं शतकी खेळी देखील केली आहे. मात्र, शुभमन गिल संघात परतल्यानंतर संजू सॅमसन मधल्या फळीत फलंदाजी करत होता. पहिल्या टी 20 मॅचमध्ये संजू सॅमसनला संधी दिल्यानंतर सोशल मीडियावरुन टीम मॅनेजमेंटवर टीका झाली होती. या दरम्यान माजी कसोटीपटू आर. अश्विन यानं भारताच्या टी 20 संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Sanju Samson : संजू सॅमसनला तिसऱ्या स्थानावर खेळवा
रविचंद्रन अश्विन यानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर संजू सॅमसन बाबत मत व्यक्त कलं. तो म्हणाला, मॅच अगोदर संजू सॅमसन का खेळत नाही याबाबत चर्चा होत होती. मात्र, शुभमन गिल उपकॅप्टन म्हणून संघात परतला तेव्हापासून संजू सॅमसनची संघात जागा होणं अवघड झालं आहे. मात्र, जर तुम्हाला संजू सॅमसनला खेळवायचं असेल तर तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, प्रामुख्यानं स्पिन विरुद्ध, असं रविचंद्रन अश्विन म्हणाला.
रविचंद्रन अश्विन पुढं म्हणाला की संजू सॅमसननं तिसऱ्या स्थानावर खेळलं पाहिजे. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव करतात. कधी सूर्या तर तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर खेळतात. दोघेही भारतीय टी 20 संघाचा कणा आहेत. संजू सॅसमन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आल्यास तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव एकाला बाहेर बसावं लागेल.
अश्विननं यावेळी हार्दिक पांड्याचं कौतुक केलं. हार्दिक पांड्यानं आशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे. पांड्यानं पहिल्या मध्ये 59 धावांची वादळी फलंदाजी केली. तर, गोलंदाजीत एक विकेट घेतली होती. हार्दिक पांड्याच्या खेळाकडे पाहून तो दुखापतीनंतर परत आलाय असं वाटत नसल्याचं अश्विन म्हणाला.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन) तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर) हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह (कुलदीप यादव, हर्षित राणा)
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर ) एडन मारक्रम (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डॉनोवन फरेरा, मार्को यानसेन, लुथो सिपामला/ कॉर्बिन जोश/ जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्तजे




















