पाकिस्तानविरोधात भारताच्या गोलंदाजीचे कॉम्बिनेशन कसे असेल, एका जागेवर पुन्हा पेच
पाकिस्तानविरोधात भारतीय संघाच्या गोलंदाजी कॉम्बिनेशन कसे असेल, यावर चर्चा सुरु झाली आहे.
India vs Pakistan : ऑस्ट्रलिया आणि अफगाणिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. शनिवारी दोन्ही संघामध्ये आमना सामना होईल. विश्वचषकात या दोन्ही संघाने आतापर्यंत दोन दोन सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहेत, पण आता शनिवारी एका संघाचा पराभव निश्चित आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनला संघात स्थान दिले होते. तर अफगाणिस्तानविरोधात शार्दूल ठाकूर याला स्थान दिले होते. पण क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, मोहम्मद शामी यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचे गोलंदाजी कॉम्बिनेशन कसे असेल, यावर चर्चा सुरु झाली आहे. आठव्या स्थानासाठी पुन्हा तीन दावेदार आहेत. शार्दूल ठाकूर, आर. अश्विन आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी एका खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल. नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण या तीन खेळाडूंबाबत विश्लेषण करण्यात आलेय. त्याबाबत जाणून घेऊयात...
मोहम्मद शमीची शक्यता -
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने पाकिस्तानविरोधात आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात शामीने 28 षटके गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोच्च कामगिरी 35 धावा देऊन चार विकेट अशी आहे. पाकिस्तानविरोधात शामीला खेळण्याचा अनुभव कमी दिसत आहे. पण अहमदाबादचे मैदान आणि खेळपट्टी शामीसाठी नवीन नाही. शामी आयपीएलमध्ये गुजरात संघाचा महत्वाचा सदस्य आहे. आयपीएल च्या 2023 हंगामात गुजरातकडून त्याने सर्वाधिक 28 विकेट घेतल्या आहेत. शामीला अहमदाबादच्या खेळपट्टीचा पूर्ण अंदाज आहे. त्याशिवाय विश्वचषकात खेळण्याचा अनुभवही शामीकडे आहे. त्यामुळे मोहम्मद शामीला पाकिस्तानविरोधात संधी मिळण्याची शक्यता आहे. अहमदाबादची खेळपट्टी चांगलीच माहिती आहे, त्यामुळे पाकिस्तानविरोधात शामीला खेळवण्याचे हे एक महत्वाचं कारण असू शकते.
रविचंद्रन अश्विनची शक्यता काय ?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमची सीमारेषा थोडी लांब आहे, त्यामुळे भारतीय संघ रविंचंद्रन अश्विन याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकते. अश्विनकडे दांडगा अनुभव आहे. अश्विन प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा करण्यापासून रोखू शकतो. भारतीय खेळपट्टीवर अश्विन प्रभावी मारा करण्यात तरबेज आहे. पाकिस्तानविरोधात खेळण्याचा अनुभवही आहे. त्याशिवाय तळाला फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे पाकिस्तानविरोधात अश्विनच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.
शार्दुल ठाकुरची शक्यता किती ?
शार्दुल ठाकुर गोलंदाजीमध्ये मिश्रण करतो, त्याशिवाय त्याचा चेंडू संथ गतीने जातो. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज अनेकदा बुचकळ्यात पडतात आणि विकेट घेतात. गोलंदाजीसोबत शार्दूल ठाकूर तळाला फलंदाजी करु शकतो. तो वेगाने धावा करण्यात तरबेज आहे. पण भारतीय संघाचे फलंदाज सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे आठव्या क्रमांकावर भारताला फलंदाजाची गरज नसल्याचे दिसतेय. त्यामुळे टीम इंडिया मोहम्मद शामीसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असेल तर अश्विनला संधी दिली जाऊ शकते.