भारताचे पाकिस्तानला 267 धावांचे आव्हान, इशान-हार्दिकची अर्धशतकी खेळी
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: पाकिस्तानची वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली.
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: पाकिस्तानची वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताला सर्वबाद केले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली. पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांची गरज आहे.
सुरुवातीची फळी ढेपाळल्यानंतर इशान आणि हार्दिक यांनी डाव सावरला. पण अखेरच्या षटकात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मोक्याच्या क्षणी एकामागोमाग एक विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. 204 धावा असताना इशान किशन याची विकेट पडली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी तंबूत परतले. 204 वर 5 अशा सुस्थितीत असणारा भारतीय संघ 8 बाद 243 अशा दयनीय अवस्थेत पोहचला. धावसंख्या वाढवण्याच्या वेळी हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी विकेट फेकल्या. अखेरीस जसप्रीत बुमराह याने फटकेबाजी केल्यामुळे भारतीय संघ 266 धावांपर्यंत पोहचला. जसप्रीत बुमराह यान 14 चेंडूत 16 धावांची खेळी केली. हार्दिक आणि इशान यांच्यानंतर बुमराहच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.
इशान-हार्दिकने डाव सावरला -
आघाडीचे 4 फलंदाज तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी हार्दिक आणि इशान किशन यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. कठीण स्थितीत या दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्याचे काम केले. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. इशान किशन इशान किशन आणि हार्दिक पांड्या ही जोडी धोकादायक झाली होती. पण त्याचवेळी हॅरीस रौफ याने इशान किशन याला बाद करत जोडी फोडली. इशान किशन याने 81 चेंडूत झटपट 82 धावांचे योगदान दिले. इशान किशन याने आपल्या खेळीत दोन खणखणीत षटकार आणि 9 दमदार चौकार ठोकले. इशान किशन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने जाडेजासोबत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्या आणि जाडेजा यांच्यामध्ये 34 चेंडूत 35 धावांची भागिदारी झाली. हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूरही लागोपाठ बाद झाले. रविंद्र जाडेजा 14 तर शार्दूल 3 धावांवर बाद झाले.
आघाडीची फळी ढेपाळली -
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे रोहित शर्माचा निर्णय चुकल्याचे दिसले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहीन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहीन याने दुसरा धक्का दिला. शाहीन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत 140 कोटी भारतीयांचा हिरमोड केला. रोहित शर्मा याने 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहीन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ याने श्रेयस अय्यर याला फखर जमान याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. भारताने 66 धावांत चार आघाडीचे फलंदाज गमावले होते. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला.
पाकिस्तानची भेदक गोलंदाजी -
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताविरोधात टिच्चून गोलंदाजी केली. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या तिकडीने भारताचा संपूर्ण संघ बाद केला. शाहिन शाह आफ्रिदी याने 4 विकेट घेतल्या. तर नसीम आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.