IND Vs NZ Semi-Final : विराट, रोहित अन् राहुलची बॅट सेमीफायनलमध्ये शांतच, वानखेडेवर बदलावा लागेल इतिहास
World Cup 2023 : विश्वचषकाचा उपांत्य सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना 'न भूतो न भविष्य' अशी कामगिरी करावी लागणार आहे.
World Cup 2023 : विश्वचषकाचा उपांत्य सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना 'न भूतो न भविष्य' अशी कामगिरी करावी लागणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या दिग्गजांची बॅट सेमीफायनल सामन्यात शांतच राहत असल्याचे आकडेवारीवरुन दिसतेय. आयसीसी वनडे सेमीफायनलमध्ये आतापर्यंत या तिकडीला मोठी कामगिरी करता आली नाही. त्याचा फटका भारताला 2019 च्या विश्वचषकातही बसला होता. तीच चूक सुधारण्याची संधी या तिकडीकडे आता आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर या तिकडीला आपली कामगिरी आणखी उंचवावी लागेल.
विराट कोहली चौथा विश्वचषक खेळत आहे. त्याने विश्वचषकाचे सहा नॉकआऊट सामने खेळले आहेत. त्यामधील चार डावात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. वनडे नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 35 इतकी आहे. जो 2011 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरोधात केला होता. दोन नॉकआऊट सामन्यात विराट कोहली फक्त एक एक धाव करुन बाद झालाय. तर एका सामन्यात नऊ आणि एका सामन्यात 9 धावा केल्या आहेत. वनडे विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीला आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकता आले नाही. विराट कोहली आतापर्यंतची आपली खराब आकडेवारी बदलण्यासाठी आज मैदानात उतरेल. न्यूझीलंडविरोधात तो मोठी खेळी करेल अशी आशा आहे.
हिटमॅन रोहित शर्मा याचीही कामिगिरी विराट कोहलीसारखीही आहे. रोहित शर्माला सेमीफायनलमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा दोन सेमीफायनल सामने खेळलाय, त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. 2015 मध्ये रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो 34 धावांवर बाद झाला. तर 2019 मध्ये रोहित शर्मा फक्त एक धाव काढून तंबूत परतला होता. त्यामुळे रोहित शर्मा आज आपले आकडे बदलण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
रोहित आणि विराट यांच्याप्रमाणे केएल राहुल यालाही वनडे सेमीफायनलमध्ये धावा काढता आल्या नाहीत. राहुलने वनडे विश्वचषकात आतापर्यंत एकच सेमीफायनचा सामना खेळला आहे. त्यामध्येही त्याला अपयश आले. 2019 मध्ये केएल राहुल न्यूझीलंडविरोधात सेमीफायनलमध्ये स्वस्तात तंबूत परतला. त्याला फक्त एक धाव काढता आली. वानखेडे स्टेडियममध्ये विराट, रोहित आणि राहुल आपली कामगिरी उंचावतील, अशीच आहे.