Shubman Gill: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस
IND vs NZ: द्विशतकं झळकावणाऱ्या खेळाडूमध्ये भारतीयांचा दबदबा, सात द्विशतकी टीम इंडियाच्या नावावर
Shubman Gill Double Century: सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) यानं न्यूझीलंडविरोधात (IND vs NZ) द्विशतकी खेळी (Double Century) करत इतिहास रचला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) 149 चेंडूत 208 धावांची वादळी खेळी केली. गिलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने (Team India) निर्धारित 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 349 धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिल (Shubman Gill) याचा अपवाद वगळता एकाही भारतीय फंलदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. शुभमन गिल (Shubman Gill) याने भारतीय संघाचा एकहाती डाव सावरला. द्विशतकी खेळीनंतर शुभमन गिल याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य क्रीडा प्रेमींपासून ते माजी खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी गिलच्या वादळी खेळीला दाद दिली आहे.
न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात सलामी फलंदाज शुभमन गिल यानं द्विशतकी खेळी केली आहे. गिलनं 149 चेंडूचा सामना करताना 208 धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान गिलने 19 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला. 140 च्या स्ट्राईक रेटनं गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
द्विशतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू (Youngest Double Centurion in ODI) -
द्विशतकी खेळीसह शुभमन गिल याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सर्वात कमी वयात द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर जमा झाला आहे. गिलनं 23 वर्ष 132 दिवस असताना द्विशतकी खेळी केली. इशान किशन याने 24 वर्ष 145 दिवस असताना द्विशतक झळकावलं होतं. तर 26 वर्ष 186 दिवस वय असताना रोहित शर्मानं द्विशतक झळकावलं होतं.
द्विशतकं झळकावणाऱ्यात भारतीयांचा दबदबा -
एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. एकट्या रोहित शर्माच्या नावावर तीन द्विशतकं आहेत. त्याशिवाय वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, इशान किशन आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा द्विशतकांची नोंद झाली आहे. त्यापैकी सात द्विशतकं भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. तर वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका फलंदाजानं द्विशतक झळकावलं आहे.
एकदिवसीय सामन्यात कुणी कुणी झळकावली द्विशतकं-
भारत - रोहित शर्मा 264 धावा
न्यूझीलंड - मार्टिन गप्टिल 237 धावा नाबाद
भारत - वीरेंद्र सेहवाग 219 धावा
वेस्ट इंडिज - ख्रिस गेल - 215 धावा
पाकिस्तान - फखर जमान 210 धावा नाबाद
भारत - इशान किशन - 210
भारत - रोहित शर्मा - 209
भारत- रोहित शर्मा - 208 नाबाद
भारत - शुभमन गिल - 208
भारत - सचिन तेंडुलकर - 200 नाबाद