IND vs IRE T20: फिनिशर रिंकू सिंहला टीम इंडियाचं तिकिट, विदर्भाच्या जितेश शर्मालाही संधी
IND vs IRE T20: आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Indian Squad For Ireland Tour : आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आशिया चषक आणि विश्वचषक पाहता सिनिअर खेळाडूंना या दौऱ्यात आराम देण्यात आला आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने आयर्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंना स्थान दिलेय. तीन सामन्याच्या टी20 मालिकेत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय तर मराठमोळा ऋतुराज गायकवाड उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या संघामध्ये युवा खेळाडूंना स्थान दिलेय. रिंकू सिंह, जितेश शर्मा, तिलक वर्मा यांच्यासारख्या युवा खेळाडूंचा या संघामध्ये भरणा करण्यात आलाय.
आयपीएलमधील कामगिरीचं बक्षीस -
आयपीएल 2023 च्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी प्रभावित केले होते. यामध्ये रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांची नावे आघाडीवर होती. कोलकात्याकडून खेळणाऱ्या रिंकू सिंह याने पाच चेंडूवर पाच षटकार लगावत सामना जिंकून दिला होता. एका रात्रीमध्ये रिंकू देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरला होता. त्याशिवाय तिलक वर्मा याने मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने धावा जमवल्या होत्या. जितेश शर्मा याने पंजाबसाठी दमदार कामगिरी केली होती. जितेश शर्मा याच्या फिनिशिंगचे सर्वच चाहते झाले होते.
Indian team for Ireland T20 series:
— Johns. (@CricCrazyJohns) July 31, 2023
Bumrah (C), Ruturaj (VC), Jaiswal, Tilak, Rinku, Samson (wk), Jitesh Sharma (wk), Dube,Sundar, Shahbaz Ahmed, Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep Singh, Mukesh Kumar, Avesh Khan. pic.twitter.com/mnMH3a5BJr
यशस्वी जयस्वाल याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय वेस्ट इंडिजविरोधात कसोटी मालिकेतही यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. त्यालाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. आवेश खान आणि रवि बिश्नोई यांचे पुनरागमन झालेय. शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर आणि शाहबाज अहमद यांचीही निवड करण्यात आली आहे.
आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना होणार आहे.
सिनिअर खेळाडूंना आराम -
आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
Ruturaj, Jaiswal, Tilak, Sanju, Dube, Rinku, Sundar, Shahbaz, Bishnoi, Bumrah, Arshdeep.
— Johns. (@CricCrazyJohns) July 31, 2023
This 11 looks perfect for Ireland series. pic.twitter.com/DSkOsvkHE5