Video : हार्दिकची झक्कास कामगिरी,रिषभची चमक ते अर्शदीपची भन्नाट गोलंदाजी, भारतानं बांगलादेशला पराभूत करत काय मिळवलं? जाणून घ्या
IND vs BAN: भारतानं एकमेव सराव सामन्यात बांगलादेशला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. या मॅचच्या निमित्तानं भारतीय संघ टी-20 कपसाठी सज्ज झाल्याचं दिसून आलं.
न्यूयॉर्क : अमेरिका आणि वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं आहे. भारताचा संघ टी-20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशानं अमेरिकेत दाखल झाला आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात सराव सामना पार पडला. भारतानं बांगलादेशला पराभूत करत विजयासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघाच्या विजयाचं क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले (Sunandan Lele) यांनी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी विश्लेषण थेट अमेरिकेतून केलं आहे. रोहित शर्मानं आवश्यक केलेले बदल, रिषभ पंतची फलंदाजी, हार्दिक पांड्याला गवसलेला सूर आणि अर्शदीप सिंगच्या दमदार गोलंदाजीबद्दल सुनंदन लेले यांनी भाष्य केलं.
एकच सराव सामना खेळला बांगलादेश विरुद्ध आणि त्या सराव सामन्यात ज्या ज्या गोष्टींची तपासणी करायची होती, जे जे बॉक्सेस टिक करायचे होते ते भारतीय संघानं केलेल्या आहेत. हाच फायदा झालाय एकमेव सराव सामन्याचा, असं सुनंदन लेले यांनी म्हटलं.
पहिली बॅटिंग करत असताना हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतची मस्त फटकेबाजी, नंतर बांगलादेशला रोखत असताना सर्व गोलंदाजांनी केलेला प्रभावी मारा हे या सराव सामन्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. नासाऊ काऊंटीच्या मैदानावर ज्या काही थोड्या प्रेक्षकांना जाण्याची परवानगी मिळाली होती ते सुद्धा वीस हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक सराव सामना पाहयाला हजर झाले होते. त्यांना अजिबात भारतीय संघानं नाराज केलेलं नाही, असं सुनंदन लेले यांनी म्हटलं.
भारताची सुरुवात अनपेक्षित झालेली होती, रोहित शर्मासोबत सलामीला यशस्वी जयस्वाल नाही तर संजू सॅमसनला पाठवण्यात आलं होतं. संजू सॅमसनला भारतीय संघाची जर्सी घातली की दमदार कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मानं थोडी चमक दाखवली. खरी चमक रिषभ पंतनं दाखवली, असं सुनंदन लेले म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
रिषभला वरती फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ज्या माणसाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्या हार्दिक पांड्यानं झक्कास टोलेबाजी केली. त्यानं मारलेले चार षटकार हे ताकदवान होते. 180 चा धावफलक ओलांडून जाण्यासाठी हार्दिक पांड्याची फलंदाजी महत्त्वाची ठरली, असं सुनंदन लेले यांनी म्हटलं आहे.
अर्शदीप सिंगनं सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण ठेवलं. त्यानं सुरुवातीला दोन विकेट काढल्या. यानंतर सर्व गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. यानंतर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेची गोलंदाजी त्या दोघांनी अपेक्षित मारा केला त्यामुळं भारतीय संघाच्या हाती विजय लागला. सराव सामन्यात जी उद्दिष्ट साध्य करायची होती ती भारतीय संघानं पद्धतशीरपणे पूर्ण केली त्यामुळं आपण म्हणून शकतो की भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे सज्ज झालाय, असं सुनंदन लेले म्हणाले.
संंबंधित बातम्या :