Ind vs Ban: आज पुन्हा येरे येरे पावसा...?, चौथ्या दिवशी कानपूरमध्ये कसं असेल हवामान; सामना सुरु झाला तरी टीम इंडियाला नुकसान!
India vs Bangladesh 2nd Test: पहिल्या दिवशी केवळ 35 षटके खेळली गेली, ज्यात बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या.
India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याला तीन दिवस उलटले तरी अजून केवळ 35 षटकांचाच खेळ झाला आहे. सामन्यातील दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौथ्या आणि पाचव्या दिवशी जरी खेळ सुरु झाला, तरी भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाचं (Team India) मोठं नुकसाना होणार आहे. पहिल्या दिवशी केवळ 35 षटके खेळली गेली, ज्यात बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या. कर्णधार नजमुल शांतोने 31 धावांचे योगदान दिले, तर शादमान इस्लाम 24 धावा करून बाद झाला. सध्या मोमिनुल हकने 40 धावा केल्या असून त्याच्यासोबत मुशफिकर रहीम 6 धावा करून क्रीजवर आहे. भारताकडून आकाशदीपने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली. दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना तब्बल २८० धावांनी जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.
आज (चौथ्या दिवशी) हवामान कसे असेल?
हवामान वेबसाइटनुसार, चौथ्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये आकाश निरभ्र आणि सूर्यप्रकाश असेल. तर ग्रीन पार्कचे स्टेडियमधील तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. सामना सुरू होण्यापूर्वी आकाश ढगाळ राहू शकते, परंतु शेवटच्या सत्रानंतर म्हणजेच चहापानानंतर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कानपूर कसोटी अनिर्णितेच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण असे झाल्यास WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग भारतीय संघासाठी गुंतागुंतीचा होऊ शकतो. भारत सध्या अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
WTC च्या गुणतालिकेची सध्यस्थिती-
WTC च्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पराभव करत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या, 39.29% गुणांसह बांग्लादेश पाचव्या, 38.89 % गुणांसह दक्षिण अफ्रिका सहाव्या, 37.50 % गुणांसह न्यूझीलंड सातव्या स्थानावर आहे. तर 19.5 % गुणांसह पाकिस्तानचा संघ आठव्या क्रमांकावर आणि 18.52 वेस्ट इंडिजचा संघ नवव्या स्थानावर आहे.