Indore Test : भारतीय संघाला अजूनही विजयाची आशा, उमेश यादव म्हणातो, 'या पीचपट्टीवर काहीही होऊ शकतं'
IND vs AUS : इंदूर टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असून ऑस्ट्रेलिया आपला दुसरा डाव खेळत 76 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत आहे.
IND vs AUS, 3rd Test : इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात कांगारू संघाला फक्त 76 धावांचे लक्ष्य विजयासाठी मिळाले आहे. इतके कमी लक्ष्य असतानाही टीम इंडिया विजयासाठी आशावादी आहे. कारण दुस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय गोलंदाज उमेश यादवने केलेल्या वक्तव्यावरून या गोष्टीचे संकेत मिळाले आहेत. या खेळपट्टीवर काहीही होऊ शकते, असं उमेश यादवनं म्हटलं आहे.
उमेश यादव म्हणाला, 'क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करु आणि तगडी गोलंदाजी करु. ही सोपी विकेट नाही मग ते आमचे फलंदाज असो किंवा त्यांचे. या खेळपट्टीवर मोठे फटके मारणं अजिबात सोपं नाही. जर चेंडू सतत खाली राहत असेल तर तुम्ही पुढे खेळण्याचा विचार करू शकत नाही. उमेश म्हणाला, 'आमच्याकडे बचावासाठी खूप कमी धावा आहेत पण आम्ही आमच्या रणनीतीनुसार खेळू आणि सामना शक्य तितक्या पुढे नेऊ.
विशेष म्हणजे या खेळपट्टीवर टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 109 धावा करता आल्या होत्या. येथे पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात बाउन्स आणि टर्न मिळत आहेत. तसंच चेंडू सतत खाली राहतो. यामुळेच येथे ऑस्ट्रेलियन फलंदाजी पहिल्या डावातही 197 धावा करू शकली आणि भारतीय संघ दुसऱ्या डावातही 163 धावांत सर्वबाद झाला.
उमेशचा गोलंदाजीसह फलंदाजीतही खास रेकॉर्ड
तिसर्या कसोटीत फलंदाजी करताना उमेश यादवने दोन शानदार षटकार ठोकले. आपल्या शानदार षटकारांच्या जोरावर त्याने युवराज सिंग आणि माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांना मागे टाकताना रन मशीन कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. उमेशने दोन षटकार मारल्याने त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील 24 षटकार झाले. विराट कोहलीनेही कसोटीत भारतासाठी इतकेच षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे उमेशने युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावे अनुक्रमे 22-22 षटकार आहेत. या रेकॉर्डनंतर उमेश यादवने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पूर्णपणे फिरकी ट्रॅक असूनही शानदार गोलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फक्त 5 षटके टाकली ज्यात 12 धावा देत महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावाच्या जोरावर फारशी आघाडी घेता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ येथे 197 धावांत ऑलआऊट झाला, तर भारतीय संघाचा पहिला डाव 109 धावांतच आटोपला होता. दरम्यान उमेश यादवपूर्वी 12 भारतीयांनी ही कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा-