Virat Kohli : 3 वर्षातील 40 डावांत फक्त 26च्या सरासरीने धावा करतोय विराट, कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचं पुनरागमन अशक्य?
Virat Kohli Test Stats : विराट कोहलीने गेल्या 38 महिन्यांत 23 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला 40 डावात केवळ 1015 इतक्याच धावा करता आल्या आहेत.
IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केल्याचं आपण साऱ्यांनीच पाहिलं आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) तो अद्याप हवी तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील इंदूर कसोटीतही (Indore Test) त्याला केवळ 22 धावा करता आल्या. त्यामुळे लाल चेंडू क्रिकेटमध्ये अर्थात कसोटी फॉरमॅटमध्ये मागील 3 वर्षांपासून तो फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येत आहे. 2020 पासून आतापर्यंत विराट कोहलीने 23 कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्याला केवळ 1015 धावाच करता आल्या आहेत.
गेल्या 38 महिन्यांत विराट कोहलीने 23 कसोटी सामन्यांत 40 डाव खेळले आहेत. त्यामध्ये तो दोनदा नाबाद राहिला असून या 40 डावांमध्ये तो 26.71 च्या फलंदाजीच्या सरासरीने फक्त धावा करु शकला. या 40 डावांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. यादरम्यान त्याला केवळ 6 अर्धशतकच ठोकता आली आहेत.
इंदूर कसोटीतही कोहली फेल
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर, इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीतही विराट कोहली डाव सावरेल असं वाटत होतं. पण तो अवघ्या 22 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीने (T Murphy) एलबीडब्लू केले. इतर फलंदाजापेक्षा कोहली (Kohli) लयीत दिसत होता. पण अखेर तोही खास कामगिरी करु शकला नाही.
भारताचा डाव ढासळला
आजच्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांच्याकडे चेंडू सोपवला. इथे भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर 26 षटकानंतर भारताची अवस्था 84 वर 7 बाद अशी होती. विशेष म्हणजे या सर्व 7 विकेट्स ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी घेतल्या. मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 तर टॉड मर्फीने एक विकेट घेतली आहे.
हे देखील वाचा-