IND vs AUS 2nd T20: दिनेश कार्तिकची फिनिशिंग, रोहित शर्माचा विश्वविक्रम; भारताच्या विजयाची 5 कारणे
कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 20 चेंडूत नाबाद 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पावसानं व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (India Beats Australia) सहा विकेट्स राखून पराभव केला.
IND vs AUS 2nd T20: कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 20 चेंडूत नाबाद 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पावसानं व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (India Beats Australia) सहा विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पावसामुळं हा सामना अवघ्या 8-8 षटकांचा खेळण्यात आला. मॅथ्यू वेडच्या 20 चेंडूत 43 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 5 बाद 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं सहा विकेट्स आणि चार चेंडू राखून हा सामना जिंकला. अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, भारताच्या विजयाची 5 मोठी कारणे जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराहचं पुनरागमन
तब्बल अडीच महिन्यानंतर संघात परतलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची छमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बुमराहनं यॉर्करवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला क्लीन बोल्ड केलं. बुमराहचं शानदार पुनरागमन भारतासाठी दिलासा देणारी बातमी आहे. बुमराहनं 2 षटकात 23 धावा देऊन एक विकेट्स घेतली.
अक्षर पटेलची दमदार गोलंदाजी
ओल्या आउटफिल्डमुळे उशीरा सुरू झालेल्या सामन्यात अक्षर पटेलनं महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यातील पहिल्याच षटकात अक्षर पटेलनं कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या षटकात तडाखेबाज फलंदाज टीम डेव्हिडला माघारी धाडलं. रवींद्र जडेजाच्या जागी संघात आलेल्या अक्षर पटेलची ही कामगिरी भारतीय संघासाठी शुभ संकेत आहे.
मोहाली सामन्याच्या तुलनेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं खराब फिल्डिंग केल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं भारतानं सामना गमावला असं म्हणण वावगं ठरणार नाही. या सामन्यात भारतानं तीन झेल सोडले होते. मॅथ्यू वेड आणि कॅमेरू ग्रीनचे झेल सोडणं भारतीय संघाल चांगलंच महागात पडलं होतं, ज्यानी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघासाठी महत्वाचं योगदान दिलं. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघान चांगली फिल्डिंग केली. विराट कोहलीनं एक अवघड झेल सोडला, . याशिवाय भारतानं 8 षटकांमध्ये फारशी चूक केली नाही.
रोहितचा विश्वविक्रम
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्यानं हेझलवूडविरुद्ध दोन षटकार ठोकलं. या षटकारांसह रोहितनं टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहचलाय. याबाबतीत त्यानं मार्टिन गप्टिलला मागं टाकलंय.
दिनेश कार्तिकची फिनिशिंग
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारताला अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. हार्दिक बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून दिनेश कार्तिकनं सामना भारताच्या बाजूनं झुकवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्यानं चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-