(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND L vs AUS L: इंडिया लीजेंड्स फायनलमध्ये! नमन ओझा, इरफान पठाणची तडाखेबाजी; ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव
2022 Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंडिया लीजेंड्सनं ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (India Legends vs Australia Legends) पाच विकेट्सनं पराभव करून फायनलमध्ये धडक दिलीय.
Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंडिया लीजेंड्सनं ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (India Legends vs Australia Legends) पाच विकेट्सनं पराभव करून फायनलमध्ये धडक दिलीय, जिथे त्यांचा सामना वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लीजेंड्सनं 20 षटकांत 5 बाद 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात नमन ओझाच्या नाबाद 90 धावा आणि त्यानंतर इरफान पठाणच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंडिया लीजेंड्सनं 4 चेंडू आणि पाच विकेट्स राखून ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा पराभव केलाय.
ट्वीट-
A terrific comeback from the @India__Legends courtesy some brave hitting from Naman Ojha and @IrfanPathan later in the order as the men in blue seal their spot in the finals!#INDLvsAUSL #RoadSafetyWorldSeries #RSWS #YehJungHaiLegendary pic.twitter.com/TRbwfw5vhQ
— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 29, 2022
पावसामुळं सामन्यात व्यत्यय
रोड सेफ्ट वर्ल्ड सिरीचा पहिला सेमीफायनल सामना इंडीया लीजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लीजेंड्स यांच्यात खेळला गेला. हा सामना बुधवारी (28 सप्टेंबर) सुरु झाला होता, पण पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना मध्यांतच थांबवावा लागला. हा सामना आज (29 सप्टेंबर) खेळला खेळाला गेला. बुधवारच्या 136/5 धावसंख्येच्या पुढं खेळत ऑस्ट्रेलिया लीजेंड्सने गुरुवारी एकही विकेट न गमावता तीन षटकांत 45 धावा जोडल्या. यासह ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवलं. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून बेन डंकनं 46 धावांची खेळी केली.
मोक्याच्या क्षणी इरफान पठाणची वादळी खेळी
ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया लीजेंड्सची सुरुवात चांगली झाली. पण इंडिया लीजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तो 11 चेंडूत 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर सुरेश रैनाही 8 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. तर, युवराज सिंहनं 15 चेंडूत 18 धावा केल्या. दरम्यान, बिन्नी आणि युसूफ पठाण पाठोपाठ बाद झाले. इंडिया लीजेंड्सला अखेरच्या दोन षटकात 24 धावांची गरज होती. इंडिया लीजेंड्सच्या डावातील 19व्या षटकात इरफान पठाणनं तीन षटकार ठोकून भारताच्या विजयाचा पाया रचला. इरफान पठाणनं 12 चेंडूत 37 धावांची वादळी खेळी केली. ज्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. हा सामना भारतानं पाच विकेट्स राखून जिंकला.
अंतिम सामना 1 ऑक्टोबरला
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सेमीफायनल सामना उद्या (30 सप्टेंबर) वेस्ट इंडीज लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 1 ऑक्टोबरला इंडिया लीजेंड्सच्या संघाशी भिडेल. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-