(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA : गुवाहाटीत रेकॉर्ड्सचा पाऊस; रोहित, विराटसह सूर्यानं केले विक्रम
IND vs SA : सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएल राहुल यांनी विस्फोटक फलंदाजी केली. या सामन्यात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात कोणते विक्रम झाले...
IND vs SA 2nd T20 2022 : गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 237 धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएल राहुल यांनी विस्फोटक फलंदाजी केली. या सामन्यात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात कोणते विक्रम झाले...
237 ही भारताची टी 20 मधील सर्वोत्कृष्ट तिसरी धावसंख्या ठरली. 2017 मध्ये भारताने श्रीलंकाविरोधात पाच बाद 260 धावांचा डोंगर उभारला होता. ही धावसंख्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय वेस्ट विंडिजविरोधात 244 धावांचा पाऊस पाडला होता. आज भारताने 237 धावांचा डोंगर उभारला. भारताची ही तिसरी सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. तर दक्षिण आफ्रिकाविरोधात आतापर्यंत कोणत्याही संघाने उभारलेली सर्वोच्च खेळी ठरली.
रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीनं पाकिस्तानच्या जोडीचा विक्रम मोडला -
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी गुवाहाटीमध्ये 96 धावांची सलामी भागिदारी केली. 50 पेक्षा जास्त धावांची भागिदारी कऱण्याची यो जोडीची ही 15 वी वेळ होती. याबाबत त्यांनी पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांचा विक्रम मोडलाय. या दोघांनी 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली आहे.
रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर विक्रम -
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागिदारी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या या जोडीने 36 डावांत 1809 धावांची भागिदारी झाली आहे. भारताकडून ही सर्वात मोठा विक्रम आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या नावावर होता. त्यांनी 52 डावांत 1743 धावा जोडल्या होत्या.
38 चौकारांचा पाऊस -
गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तब्बल 38 चौकारांचा पाऊस पाडला. टी 20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात भारतीय टीमने दुसऱ्यांदा सर्वाधिक चौकार लगावले आहेत. याआधी 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारताने 42 चौकार लगावले होते.
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीची भागिदारी -
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी शतकी भागिदारी केली. दोघांनी 42 चेंडूत 102 धावांची भागिदारी केली. भारताकडून सर्वात वेगवान शतकी भागिदारी ठरली. याआधी धोनी आणि राहुल यांनी 49 चेंडूत 107 धावांची भागिदारी केली होती.
400 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय
कर्णधार रोहित शर्मा 400 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासह लीग सामन्यांचाही समावेश आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 191, भारतासाठी 141, डेक्कन चार्जर्स 47 सामने खेळले आहेत. त्याशिवाय मुंबईसाठी 17 आणि इंडियंस आणि इंडिया-एसाठी दोन दोन सामने खेळले आहेत.
विराटचा 11 हजार धावांचा पल्ला -
गुवाहाटीमध्ये विस्फोटक फलंदाजी करत विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला पार केला. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. तर जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं 354 टी 20 सामन्यात 11 हजार धावांचा पल्ला टप्पा पार केला आहे.
'सूर्यादादा'ची कमाल
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एक भीमपराक्रम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या टी20 मध्ये केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत म्हणजेच 543 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. 31 डावांत त्याने ही कामगिरी केली असून सर्वात जलदगतीने 1000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तो सातव्या स्थानावर तर भारतीयांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण सर्वात कमी चेंडूत ही कामगिरी करणाऱ्यांमध्ये तो अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.