(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya : 6,6,6,6,4…CSK ने त्याच्यासाठी 2.2 कोटी मोजले, हार्दिकने मात्र जमिनीवर आणलं, बड्या बॉलरची मैदानावर दाणादण!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाने तामिळनाडू संघावर 3 गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली.
Baroda vs Tamil Nadu Group B SMAT : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाने तामिळनाडू संघावर 3 गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. बडोद्यासाठी हार्दिक पांड्या हा सर्वात मोठा हिरो होता. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तामिळनाडू संघाने एन जगदीसनच्या अर्धशतकाच्या जोरावर 221 धावा केल्या आणि बडोद्याला आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मोठे लक्ष्य दिले.
हार्दिक पांड्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने ज्या गोलंदाजासाठी 2.2 कोटी मोजले, त्या गोलंदाजाचा हार्दिक पांड्याने चांगलाच समाचार घेतला. हार्दिकने गुर्जपनीतविरुद्ध शानदार फलंदाजी करत त्याच्या षटकात एकामागून एक चार षटकार ठोकले. चार षटकारांसह टीम इंडियाच्या पांड्याने चौकारही लगावला आणि एका षटकात 29 धावा केल्या. हार्दिकने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले, या जोरावर बडोद्याने 222 धावांचे मोठे लक्ष्य पार केले.
𝐇𝐚𝐫𝐝 𝐇𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠 Pandya 🥵
— JioCinema (@JioCinema) November 27, 2024
Keep watching the #IDFCFirstBankSyedMushtaqAliTrophy on #JioCinema and #Sports18Khel! 👈#JioCinemaSports #SMAT pic.twitter.com/yQrwE2Wgtq
प्रथम गोलंदाजी करताना बडोद्याच्या गोलंदाजांना विशेष काही कामगिरी करता आली नाही. लुकमान मेरीवालाने सर्वाधिक 3 बळी घेतले. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याही महागात पडला. त्याने चार षटकांत 44 धावा दिल्या आणि एकही विकेट घेता आली नाही. अतित शेठने तीन षटकात 50 धावा दिल्या. तामिळनाडूकडून एन जगदीसनने 57 आणि विजय शंकरने 42 धावांचे योगदान दिले. याशिवाय कर्णधार शाहरुख खानने 39 धावा केल्या.
हार्दिक पांड्याला गोलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही, पण आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकण्यात तो यशस्वी ठरला. त्याने अवघ्या 30 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 69 धावा केल्या. त्याच्यामुळेच संघाला सामना जिंकण्यात यश आले. संघाला नऊ धावांची गरज असताना अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला. तो बाद झाला तोपर्यंत बडोदा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. अतित शेठने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून बडोद्याला विजय मिळवून दिला.
दुसरीकडे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येच कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने महाराष्ट्राचा पाच गडी राखून पराभव केला. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने 26 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतलेल्या श्रेयसने 39 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. रहाणेने 34 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. मुंबईने विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य 17.1 षटकात पूर्ण केले. तत्पूर्वी, शार्दुल ठाकूर आणि मोहित अवस्थी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत महाराष्ट्राला नऊ विकेट्सवर 171 धावांवर रोखले.