Hardik Pandya Captain : वर्ल्डकपनंतर संघात स्थानही नसणारा पांड्या आता थेट 'कॅप्टन', आयपीएलमधील कामगिरीचं हार्दिकला बक्षिस
Hardik Pandya : आधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी सिलेक्ट झाल्यानंतर आतातर थेट आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून वर्णी लागली आहे.
Captain Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएल 2022 मध्ये केलेली दमदार कामगिरी आता त्याच्यासाठी भारतीय संघाचं कर्णधारपदही घेऊन आली आहे. आधी हार्दिक पांड्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी थेट टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री मिळाली ज्यानंतर आता आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय़ने नुकतीच संघाची घोषणा केली यावेळी हार्दिकला कर्णधार तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आलं आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू याने बरेच सामने गाजवले आहेत. काही सामने जिंकवले असून काही सामन्यात भारत पराभूत झाला तरी पांड्याने त्याची वेगळी छाप सोडली आहे. पण 2021 च्या टी20 विश्वचषकात मात्र संघात सिलेक्शन झाल्यानंतरही हार्दिकला खास कामगिरी करता आली नाही. गोलंदाजी तर त्याने केली नाहीच. पण फलंदाजीतही तो काही करु शकला नाही. त्यात सतत दुखापतींमुळे हार्दिकचं करीयरचं संपतं की काय असं वाटत होतं. काही सामन्यांसाठीतर हार्दिकला भारतीय संघात स्थानही मिळालं नाही. त्यानंतर त्याने प्रचंड मेहनत घेतली, ज्यानंतर आयपीएल 2022 मध्ये पुन्हा व्हिटेंज पांड्या परतला फलंदाजीत दमदार कामगिरी करत संघाला जेतेपद त्याने मिळवून दिलं आणि याचच बक्षीस त्याला आता थेट भारतीय संघात स्थानाशिवाय कर्णधारपदही मिळालं आहे.
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.
'देशाचं प्रतिनिधित्त्व सर्वात मोठी गोष्ट'
आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्यानं 30 चेंडूत 34 धावा केल्या. तसंच चार षटकात 17 धावा देऊन राजस्थानच्या चार महत्वाच्या फलंदाजाना माघारीही धाडलं. ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान, पत्रकार परिषेद बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याला भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. त्यासाठी काहीही करण्याची हार्दिकची तयारी आहे. भारतासाठी खेळणं माझं खूप मोठं स्वप्न होतं. आपण कितीही सामने खेळलो तरी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट असते.
भारताचा आयर्लंड दौरा
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यातील पहिले तीन सामने झाले असून भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान आता 19 जून रोजी हे सामने संपल्यानंतर 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका भारतीय संघ खेळणार आहे. या मालिकेत असणारे दोन सामने 26 आणि 28 जून रोजी आयर्लंडच्या मलाहाइड येथील डबलिन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
हे देखील वाचा-