Happy Birthday Virat Kohli | सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये सामील विराट कोहलीच्या नावावर 'या' विक्रमांची नोंद!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 32 वा वाढदिवस आहे. एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आक्रमक फलंदाजीमुळे अनेक विक्रम आपल्या नावावर करत दिग्गजांना मागे टाकलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 32 वा वाढदिवस आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला होता. एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आक्रमक फलंदाजीमुळे अनेक विक्रम आपल्या नावावर करत दिग्गजांना मागे टाकलं आहे. विराटने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये 416 सामने खेळून एकूण 70 शतकं केली आहे. याबाबतीत तो केवळ सचिन तेंडुलकर (100) आणि रिकी पॉण्टिंगच्या (71) मागे आहे.
विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार समजलं जातं. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची बॅट तळपली आहे. विराटने आतापर्यंतच्या कारकीर्दीत 86 कसोटी सामन्यात 53.62 च्या सरासरीने 7240 धावा, वनडेमधील 248 सामन्यांमध्ये 59.33 च्या सरासरीने 11867 धावा आणि टी-20 च्या 82 सामन्यात 50.80 च्या सरासरीने 2794 धावा केल्य आहेत.
विराटच्या नावावर अनेक विक्रम विराट कोहलीने क्रिकेटच्या विश्वात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली हा सर्वाधिक दुहेरी शतक करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत सात दुहेरी शतकांची नोंद आहे. सोबतच कर्णधार म्हणून जगातील सर्वाधिक दुहेरी शतकांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. कर्णधार म्हणून त्याने सहा शतकं केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सलग चार मालिकांमध्ये चार दुहेरी शतक करणारा विराट एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000, 9000, 10000 आणि 11000 धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्याच नावावर आहे. याशिवाय विराट कोहलीच्या नावावर इतरही विक्रमांची नोंद आहे.
कोहलीच्या नेतृत्त्वात अंडर-19 विश्वचषक जिंकला विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने 2008 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं होतं. विराटने 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दांबुला कसोटीतून पदार्पण केलं होत. तर जानेवारी 2017 मध्ये विराटकडे एकदिवसीय आणि ट्वेण्टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली.
71 वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय महेंद्र सिंह धोनीने 2014 च्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. 2018 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तब्बल 71 वर्षांनी मालिका विजय साजरा केला होता.
छोले-भटूरेचा चाहता विराट कोहली आपल्या फिटनेसबाबत अतिशय सजग असतो. परंतु राजमा चावल आणि छोले भटूरेचा हे आवडते पदार्थ असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. कॉलेजच्या दिवसात दिल्लीच्या तिळकनगरमधील एका दुकानात छोले-भटूरे खाण्यासाठी कायम जात असल्याचं त्याने सांगितलं होतं.
कोहली लवकरच बाबा बनणार विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला होता. त्याचे वडील प्रेम कोहली क्रिमिनल लॉयर होत. 2006 मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झालं. तो आईच्या अगदी जवळ आहे. त्याने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत इटलीमध्ये लग्न केलं होतं. विराट लवकरच बाबा बनणार असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.