Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Suresh Dhas: भाजप सुरेश धस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
बीड: बीड जिल्ह्यात 'आकां'ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आम्ही परळीत बघत असतो, प्राजक्ता माळी (Prajakta Mali), रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी खळबळजनक आरोपांची राळ उडवून दिली.
यावेळी सुरेश धस यांनी पुन्हा एकदा 'आका'चा उल्लेख केला. बीडमधील 'आका'च्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल 1400 एक गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे. शिरसाळा गावात गायरान जमिनींवर 600 वीटभट्ट्या आहेत. यापैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. या वीटभट्ट्या 'आका'च्या कार्यकर्त्यांच्या आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला. 'आका'चे कार्यकर्ते येथून काही अंतरावर असलेल्या 50 ते 60 एकर जमिनीवरील मुरुम काढून आणतता आणि दुसऱ्या जमिनीवर टाकतात. रसाळ आडनावाचा माणूस हे काम करतो. आकांनी या भागात 50 एकर जमीन घेतली आहे, पूर्ण बोगदा बुजवला आहे. गोरगरीब म्हणतात आमच्या जमिनीतून मुरून नेऊ नका. पण तरीसुद्धा गँग्ज ऑफ वासेपुरने जबरदस्तीने फिलिंग केले आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला.
बीडमधील व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार, मलेशिया कनेक्शन: सुरेश धस
सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव बेटिंग अॅप प्रकरणात गुंतलेल्या बीडमधील एका व्यक्तीचा उल्लेख केला. हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात दोन अधिकारी होते. या व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. 100 कोटी रुपयांच्या पुढे आर्थिक गैरव्यवहार असल्यास ईडीकडून तपास केला जातो. पण 9 अब्ज रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी तुम्ही कोणती यंत्रणा आणणार? महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जो घोटाळा झाला त्यामध्ये चांगले पोलीस अधिकारी बाहेर काढले गेले. निष्क्रिय आणि आम्ही सांगू तेच करतील, अशा अधिकाऱ्यांना ठेवण्यात आले. या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपींना जामीन करुन देणं, त्यांना सहकार्य करणं, असे प्रकार घडले. त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
आणखी वाचा