SA vs ENG : ऐतिहासिक मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडचा 414 धावांचा डोंगर, आफ्रिकेचा डाव 72 धावांवर आटोपला
ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं पलटवार केला.

लंडन : दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेनं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत जिंकला आहे. इंग्लंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 414 धावा केल्या होत्या. जो रुट आणि जॅकब बैथेल यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडनं 414 धावांचा टप्पा गाठला. यामध्ये जो रुट आणि जॅकब बैथेल या दोघांनी 182 धावांची भागिदारी केली. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 72 धावांवर आटोपला. आफ्रिकेचा कॅप्टन तेम्बा बावुमा फलंदाजी करु न शकल्यानं इंग्लंडनं 342 धावांनी विजय मिळवला. जोफ्रा आर्चरनं चार, आदिल राशिदनं 3 आणि बी. कार्सनं 2 विकेट घेतल्या. चार विकेट घेतल्याबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जोफ्रा आर्चरला देण्यात आला.
इंग्लंडच्या डावाची सुरुवात बेन डकेट आणि जैमी स्मिथ यांनी केली. स्मिथनं 62 धावा केल्या तर डकेटनं 31 धावा केल्या. जो रुटनं 100 धावा करत कारकीर्दीतील 19 वं शतक केलं. तर, जॅकब बैथेल यानं 82 धावांमध्ये 110 धावा केल्या आहेत. जोस बटलरनं 32 धावांमध्ये 62 धावा केल्या.इंग्लंडनं अखेरच्या 9 ओव्हरमध्ये 112 धावा केल्या.
आर्चरच्या वादळात दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला
इंग्लंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 414 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. जोफ्रा आर्चर आणि कार्सच्या माऱ्यापुढं दक्षिण आफ्रिकेनं 7 धावांमध्ये 4 विकेट गमावल्या. तर, टीमच्या 18 धावा झालेल्या असताना आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. एडन मार्क्रम 0, रियान रिकल्टन 1 रन, वियान मुल्डर 0, ब्रीत्झके 4 रन, स्टब्स 10 रन,ब्रेविस 6 रन, कॉर्बिन बॉश 20, केशव महाराज 17, कोदी युसूफ 5 आणि नांद्रे बर्जर 2 धावा करु शकले. जोफ्रा आर्चरनं दक्षिण आफ्रिकेच्या चार विकेट घेतल्या. कार्सनं दोन विकेट घेतल्या तर आदिल राशिदनं 3 विकेट घेतल्या यामुळं आफ्रिकेचा संघ 72 धावांवर आटोपला.
दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय
दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडमध्ये गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी केलेली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसीची स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकनं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली. मात्र, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं पलटवार करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वात आफ्रिकेला मोठं यश मिळतंय.





















