Dukes Ball in WTC Final Ind vs Aus: ड्यूक बॉलनं खेळवली जाणार WTC फायनल; भारताच्या SG बॉलपेक्षा खूपच वेगळा
Dukes Ball in WTC Final Ind vs Aus: भारतीय संघाला 7 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. हा कसोटी सामना ड्यूक बॉलनं खेळवला जाईल.
Dukes Ball in WTC Final Ind vs Aus: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सीझन अतिशय रंगतदार झाला. आयपीएल आटोपून आता टीम इंडियाचे धुरंधरांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलसाठी कंबर कसली आहे. कसोटी क्रिकेटमधील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली आहे. लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर WTC चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 7 जूनपासून WTC च्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येणार आहेत.
भारतीय संघाला 7 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापासून आयसीसीनं जारी केलेल्या अनेक नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. त्यासोबतच हा कसोटी सामना ड्यूक बॉलनं खेळवण्यात येणार आहे. तसं पाहिलं तर टीम इंडियाला घरच्या मैदानांवर एसजी बॉलनं खेळण्याची सवय आहे. जाणून घेऊया कसोटी क्रिकेटमध्ये किती प्रकारचे चेंडू वापरले जातात आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? त्याबाबत सविस्तर...
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल न्यूट्रल वेन्यूवर खेळवला जात आहे. हा कसोटी सामना ड्यूक बॉलनं खेळवला जाईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना याची जास्त चिंता करण्याची गरज नाही, कारण टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलमध्ये एसजी बॉलनंचं क्रिकेट खेळत होते.
WTC फायनलमध्ये वापरला जाणार ड्यूक बॉल
टीम इंडिया आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मिळालेल्या ब्रेकमध्ये ड्यूक बॉलनं सराव करत आहे. खेळाडूंना आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडूंनी ड्यूक बॉलनं सरावही केला.
अशातच चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे की, नेमका एसजी आणि ड्यूक बॉल आहे काय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ड्यूक बॉलचाच वापर का केला जाणार? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...
क्रिकेटमध्ये किती प्रकारचे चेंडू वापरले जातात?
सध्या वर्ल्ड क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे चेंडू वापरले जातात. कूकाबुरा, ड्यूक आणि एसजी बॉल. हे तिन्ही प्रकारचे बॉल्स वेगवेगळ्या देशांमध्ये वापरले जातात.
कोणत्या देशात क्रिकेट सामन्यांसाठी कोणता चेंडू वापरला जातो?
वर्ल्ड क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट सामने खेळणाऱ्या देशांमध्ये सर्वाधित कूकाबुरा बॉलचा वापर केला जातो. या बॉलनं 8 देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. कूकाबुराचा वापर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, न्यूझीलंड, बांग्लादेश, झिम्बाब्बे आणि अफगाणिस्तानमध्ये होतो. तर ड्यूक बॉलचा वापर इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी होतो. भारत हा एकमेव देश आहे, जिथे एसजी बॉलचा वापर केला जातो.
कोणत्या देशात कोणता चेंडू वापरतात?
कूकाबुरा : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, साउथ अफ्रीका, न्यूजीलैंड, बांग्लादेश, जिम्बाब्वे आणि अफगानिस्तान.
ड्यूक : इंग्लंड, आयरलँड आणि वेस्ट इंडीज
एसजी बॉल : भारत
तिन्ही बॉल्सची वैशिष्ट्यै काय?
इंग्लंडमध्ये बनवलेला ड्यूक बॉलच्या कडा उंच असतात. या चेंडूची शिलाई हातानं केली जाते. वेगवान गोलंदाजांना या चेंडूची अधिक मदत मिळते. ड्यूक बॉलचा कडकपणा 60 षटकांपर्यंत जसाच्या तसा राहतो. 20-30 षटकांनंतरच गोलंदाजांना या चेंडूतून रिव्हर्स स्विंग मिळू लागते.
कूकाबुरा आणि एसजी बॉल हे रिव्हर्स स्विंगच्या बाबतीत थोडे वेगळे आहेत. 50 षटकांच्या आसपास दोन्ही चेंडूंपासून रिव्हर्स स्विंग सुरू होतो. एसजी बॉलबद्दल बोलायचं झालं तर, तो फक्त भारतातच बनवला जातो. त्याची शिलाई देखील ड्यूकप्रमाणे हातानं केली जाते. या बॉलच्या कडाही उंचावलेल्या असतात. हा चेंडू वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना अधिक मदत करतो.
कूकाबुरा बॉल ऑस्ट्रेलियामध्येच बनवला जातो. याची शिलाई मशीनने होते. या चेंडूच्या कडा फारशा उंचावलेल्या नसतात. सुरुवातीला 20 ते 30 ओव्हर्सनंतर हा बॉल वेगवान गोलंदाजीसाठी उत्तम मानला जातो. या चेंडूच्या कडा जास्त उंचावलेल्या नसल्यामुळे हा चेंडू स्पिनर्ससाठी इतर चेंडूंच्या तुलनेत फारसा फायदेशीर ठरत नाही.
चेंडूच्या वापराबाबत आयसीसीचे नियम काय?
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) नुसार, चेंडूच्या वापराबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. ज्या देशात सामना किंवा मालिका खेळवण्यात येणार असते, तो देश आपल्या आवडीनुसार चेंडूचा वापर करतो. एखादा देश प्रत्येक मालिका वेगळ्या चेंडूनं खेळू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WTC Final Ind vs Aus: 'सॉफ्ट सिग्नल' हद्दपार, हेल्मेटही... WTC फायनलमध्ये नव्या नियमांची नांदी