Vinod Kambli: तोतया बँक अधिकाऱ्याकडून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींची फसवणूक, केवायसी अपडेटच्या नावाखाली लाखो रुपये लुटले
Vinod Kambli: स्मार्टफोन हातात आल्यामुळं प्रत्येकजण ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देऊ लागला आहे. मात्र, दुसरीकडं सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ होऊ लागलीय.
Vinod Kambli: कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात (Online Transactions) लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन हातात आल्यामुळं प्रत्येकजण ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देऊ लागला आहे. मात्र, दुसरीकडं सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ होऊ लागलीय. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनं नागरिकांची फसवणूक करीत असल्याचं अनेक घटना उघडकीस येत आहेत. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातलाय. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तोतया बँक अधिकाऱ्यानं विनोद कांबळी यांना फोन केला. या लिंकवरील जाऊन अँप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी विचारला. कांबळी यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातून 1 लाख 14 हजार गायब झाले. त्यानंतर विनोद कांबळींनी त्याला फोन केला. मात्र, त्यानं फोन बंद केला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विनोद कांबळी यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
सध्या सायबर गुन्हेगारीच्या संख्येत मोठी वाढ झालीय. सायबर गुन्हेगार मानसिक दृष्टीनं कमजोर असलेल्या नागरिकांना लक्ष्य करतात. तसेच विविध आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवात आणि त्यांची लूट करतात. दरम्यान, प्रत्येक बॅंकेकडून त्यांच्या खातेदारांना त्यांचा ओटीपी किंवा कोणतीही खाजगी माहिती कोणालाही शेअर न करण्याचं आवाहन करतात. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना घडतच आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha