Team India : बीसीसीआयचा विदेशी नाही भारतीय खेळाडूवर सोपवणार गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी? कुणाचं नाव आघाडीवर?
Team India : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. तर, गोलंदाजी प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.,
नवी दिल्ली : बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची भारताच्या टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारताच्या (Team India) श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारेल. राहुल द्रविडचा कार्यकाळ टी 20 र्ल्ड कप 2024 नंतर संपला. राहुल द्रविडच्या सोबत असलेल्या सपोर्ट स्टाफची मुदत देखील संपली. आता गौतम गंभीर सोबत नवा सपोर्ट स्टाफ असणार आहे. बीसीसीआय सपोर्ट स्टाफमध्ये कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे. विनय कुमार याचं नाव गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून समोर आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयची विनय कुमारच्या नावाला पसंती नसल्याची माहिती आहे. बीसीसीआय माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या (Zaheer Khan) नावावर गांभीर्यानं विचार करत असून त्याला संधी दिली जाऊ शकते.
रिपोर्टनुसार बीसीसीआयची अपेक्षा गोलंदाजी प्रशिक्षकाकडे अनुभव असणं आवश्यक आहे. त्यामुळं विनय कुमारचं नाव मागं पडलं आहे. झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक करणं फायदेशीर ठरेल, असं मत बीसीसीआयचं आहे. झहीर खान भारताच्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य देखील होता.
गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक केल्यानंतर सपोर्ट स्टाफ निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं जाईल अशा चर्चा होत्या. मात्र,बीसीसीआयनं गंभीरला त्याबाबत स्वातंत्र्य दिलं नसल्याचं दिसून येतं. अभिषेक नायर टीम इंडियाचे सहायक कोच असतील अशा चर्चा आहेत. मात्र, बीसीसीआयनं त्याची पुष्टी केली नाही.
राहुल द्रविडसोबत जो सपोर्ट स्टाफ होता, त्यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. आता नव्यानं सपोर्ट स्टाफ निवडण्यात येईल. टी. दिलीप यांना भारताच्या क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते. मात्र, यावर देखील शिक्का मोर्तब करण्यात आलं नाही.
गौतम गंभीरला मदत करण्यासाठी गोलंदाजी प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत झहीर खान, एल. बालाजी आणि विनय कुमारसह दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मोर्ने मॉर्कलचं देखील नाव चर्चेत आहे.
गंभीरची पहिली परीक्षा श्रीलंकेविरुद्ध
गौतम गंभीरला प्रशिक्षक केल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदा श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत विजय मिळवण्याचं आव्हान गंभीरपुढं असेल. गौतम गंभीरचा कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कप पर्यंत आहे. टीम इंडियाला आगामी काळात आयसीसीच्या चार स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतात होणारा टी 20 वर्ल्ड कप आणि 2027 चा वनडे वर्ल्ड कपचा त्यामध्ये समावेश आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेतेपद मिळवतो का हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :