Rahul Dravid: एकच मन किती वेळा जिंकणार, राहुल द्रविड कोच पदावरून जाता जाता इतर स्टाफला सर्व काही देऊन गेला!
T20 World Cup 2024 Rahul Dravid: टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला.
T20 World Cup 2024 Rahul Dravid: टी-20 क्रिकेट विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला. आयसीसीकडून 20.4 कोटी, तर बीसीसीआयकडून 125 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उर्वरित प्रशिक्षकमधील सदस्यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये देण्यात येणार आहे. मात्र राहुल द्रविडने अतिरिक्त पैसे घेण्यास नकार दिला आहे. मला 5 कोटी रुपये नको, इतर प्रशिक्षकांप्रमाणे मला देखील 2.5 कोटी रुपये देण्यात यावे, असं राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. राहुल द्रविडच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Rahul Dravid wanted the same prize money of his other coaching staff (2.5 crores) as he refuses to take extra money which was the same as players (5 crores). [Hindustan Times]
— Johns. (@CricCrazyJohns) July 10, 2024
- A BIG SALUTE, DRAVID 🫡 pic.twitter.com/wWX6Re8R8C
रिपोर्ट्सनुसार कोणाला किती रूपये मिळणार?
प्रत्येकी 5 कोटी - 15 खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड
प्रत्येकी 2.5 कोटी - प्रशिक्षक (फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी)
प्रत्येकी 2 कोटी - फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशालिस्ट, मालिश करणारे आणि कंडिशनिंग
प्रत्येकी 1 कोटी - निवडकर्ते आणि राखीव खेळाडू
राहुल द्रविड यांना भारतरत्न द्या-
भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी केली आहे. राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कारानं केंद्र सरकारनं सन्मानित करणं योग्य राहील, तो त्याचा दावेदार देखील आहे, असं सुनील गावसकर यांनी म्हटलं.राहुल द्रविड महान खेळाडू आणि कॅप्टन राहिला आहे. जेव्हा राहुल खेळत होता त्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका जिंकणं अवघड होतं. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात मालिका जिंकणारा राहुल द्रविड तिसरा कॅप्टन ठरला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीत नव्या खेळाडूंना उभं करण्यात त्याचं योगदान महत्त्वाचं आहे, असं सुनील गावसकर म्हणाले.
राहुल द्रविडचं भारतीय क्रिकेटमध्ये मोठं योगदान-
राहुल द्रविड यांनी भारतासाठी 164 कसोटी मॅचेसमध्ये 13,288 धावा केल्या. तर, 344 वनडे मॅचेसमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. राहुलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर 48 शतकं आणि 146 अर्धशतकं आहेत. 2003 च्या दरम्यान भारतीय संघात तज्ज्ञ विकेटकीपर नव्हता त्यावेळी राहुल द्रविडनं विकेटकीपर म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती.