Gautam Gambhir : गौतम गंभीरची नोकरी धोक्यात... 'या' दिवशी ठरणार राहणार की जाणार, BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Gautam Gambhir Team India Coaching : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. आता गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारवर आहेत. पुढील SGM बैठकीत बीसीसीआय त्याच्या कामगिरीवर चर्चा करू शकते, अशी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयची ही बैठकी 12 जानेवारीला होणार आहे.
या बैठकीचा मुख्य अजेंडा म्हणजे सचिव आणि खजिनदार पदाची निवडणुका घेण्याशी संबंधित आहे. जय शाह यांच्या जागी देवजीत सैकिया यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून ते सप्टेंबर 2025 पर्यंत या पदावर राहतील. तर कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांचा दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कामगिरीवर होणार चर्चा?
टेलिग्राफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत गौतम गंभीर आणि त्याच्या प्रशिक्षक संघाच्या कामगिरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक मुद्दा नसला तरी अलीकडची कामगिरी पाहता गंभीरच्या कोचिंगबाबत बोर्डातील काही सदस्यांमध्ये असंतोष वाढत आहे. 2024-25 बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (BGT) मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-3 ने पराभव झाल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल शर्यतीतून पण बाहेर गेली.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी गंभीरसाठी शेवटची संधी?
गौतम गंभीरसाठी सर्वात मोठे संकट म्हणजे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 त्याच्या कार्यकाळातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, तर त्यांच्या कोचिंगवर मोठे प्रश्न उपस्थित होण्याची शकता आहे. खराब फॉर्म आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती ही टीम इंडियाच्या अलीकडच्या अपयशामागील प्रमुख कारणे आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती, तर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे गोलंदाजी कमकुवत झाली आहे.
गौतम गंभीरचा कोचिंग कार्यकाळ
गौतम गंभीरने सप्टेंबर 2024 मध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, जेव्हा टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्या शिखरावर होती. त्यावेळी भारत कसोटी आणि वनडेमध्येही चांगल्या स्थितीत होता. बांगलादेशला कसोटीत 2-0 ने पराभूत करून गंभीरने प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू केला. मात्र यानंतर संघाची कामगिरी घसरत गेली.
टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भारताला 0-3 ने पराभव पत्करावा लागला, जी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडली. यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्येही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.