Axar Patel : टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये बाद झाल्यामुळे नाराज होता अक्षर पटेल; बुमराहने मनोबल वाढवलं, म्हणाला...
T20 World Cup 2024 Final : अक्षर पटेलने सांगितलं की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये तो स्वत:च्या चुकीमुळे आऊट झाला होता.
मुंबई : भारताने टी20 विश्वचषकात विजय मिळवून 17 वर्षांपासूनचं कोट्यवधी भारतीयाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताने विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेकडून सामना हिसकावून घेतला आणि विश्वचषकावर नाव कोरलं. यासामन्यात भारताची सुरुवातीची फळ ढेपाळल्यानंतर एकीकडे विराट कोहली धुरा सांभाळून होता, त्यावेळी अक्षर पटेलने त्याला साथ दिली. भारताच्या विजयात अक्षर पटेलने गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावली.
विश्वचषकात अक्षर पटेलची चांगली खेळी
विश्वचषकात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. भारताने पहिल्या तीन विकेट पटापट गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी सलामीला उतरली. रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला, त्यानंतर रिषमलाही चांगली खेळी करता आली नाही. रिषम बाद झाल्यावर सूर्यकुमारही मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पाच ओव्हर संपण्याच्या आधीच टीम इंडियाचे तीन फलंदाज बाद झाले होते.
अंतिम सामना जिंकण्यात अक्षरचा सिंहाचा वाटा
अवघ्या 4.3 षटकात भारताचे तीन गडी बाद झाले होते. एका बाजूला विराट कोहली भक्कमपणे उभा होता, पण त्याला दुसऱ्या साथीदाराची गरज होती. ही साथ दिली अक्षर पटेलने. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने दमदार फलंदाजी केली. अक्षरने 31 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अक्षर अन् विराटने 72 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताला 176 ही धावसंख्या गाठता आली.
बाद झाल्यावर रागात होता अक्षर पटेल
दरम्यान, 47 धावा करुन बाद झाल्यावर अक्षर पटेल रागात होता. अक्षर पटेलने एका मुलाखतीत, या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्याने सांगितलं की, स्वत:च्या चुकीमुळे बाद झाल्यामुळे त्याला प्रचंड राग आला होता आणि तो नाराजही होता. यावेळी जसप्रीत बुमराहने त्याचं मनोबल वाढवलं. यावेळी बुमराह नेमकं काय म्हणाला, ते वाचा.
बुमराहने अक्षर पटेलचं मनोबल वाढवलं
अक्षर पटेलने म्हणाला की, "मी चुकीच्या वेळी आऊट झालो. ती माझी चूक होती. मी सावध नव्हतो. मला स्वतःचाच राग आला होता. मी चांगले शॉट मारत होतो आणि त्याचवेळी विराटही दुसऱ्या टोकाला चांगली खेळी करत होता." त्याने पुढे सांगितलं की, "आम्ही वेगवान धावा काढण्याचा विचार करत होतो. आम्ही नक्कीच जास्त धावा करू शकलो असतो. त्यामुळे मी नाराज होतो. तंबूत परतल्यावर मी तीन षटके एकटाच बसलो होतो, मग बुमराह आला आणि माझ्या खांद्यावर थोपटून म्हणाला, तुला चार षटके गोलंदाजी करायची आहे. तू खेळाला चांगली गती दिली आहेस, आता हे विसरुन जा." असं अक्षर पटेलने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :