AUS vs ZIM ODI Series: अखेरच्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला रडवलं; तीन विकेट्सनं सामना जिंकला!
AUS vs ZIM ODI Series: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर तिसऱ्या आणि अखरेच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं ऑस्टेलियाच्या डोळ्यात पाणी आणलं.
AUS vs ZIM ODI Series: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Zimbabwe tour of Australia) गेलेल्या झिम्बाब्वेनं तीन विकेट्सनं तिसरा एकदिवसीय सामना जिंकला. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर तिसऱ्या आणि अखरेच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं ऑस्टेलियाच्या डोळ्यात पाणी आणलं. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 31 षटकात 141 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या संघानं 39 व्या षटकातंच तीन विकेट्स राखून हा सामना जिंकला.
रायन बर्लची भेदक गोलंदाजी
या सामन्यात नाणफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झिम्बाब्वेचा लेगस्पिनर रायन बर्लच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 141 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरनंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि संघानं नियमित अंतरानं विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज क्रीझवर जास्त काळ टिकू शकला नाही. या सामन्यात रायन बर्लनं फक्त 10 धावा देऊन 5 विकेट घेतल्या आहेत.
झिम्बाब्वेचा इतिहासिक विजय
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं तीन विकेट्स राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून रेगीस चकाब्वानं सर्वाधिक नाबाद 37 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या विजयासह झिम्बाब्वेनं इतिहासाला गवसणी घातलीय. झिम्बाब्वेच्या संघानं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत केलंय.
झिम्बाब्वेचा शेवट गोड
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर कब्जा केला. तसेच या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विजय मिळवून झिम्बाब्वेच्या संघाला क्लीन स्वीप देण्याच्या उद्देशानं ऑस्ट्रेलियाच संघ मैदानात उतरला होता. परंतु, या सामन्यात याउलट चित्र पाहायला मिळाले. अखेरच्या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला 141 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर तीन विकेट्सनं हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड केला.
संघ-
झिम्बाब्वेचा संघ:
ताकुडझ्वानाशे कैतानो, तादिवानाशे मारुमनी, वेस्ली माधेवरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रेगिस चकाब्वा (विकेटकिपर), रायन बर्ल, टोनी मुन्योंगा, ब्रॅड इव्हान्स, रिचर्ड नगारावा, व्हिक्टर न्याउची.
ऑस्ट्रेलियाचा संघ:
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अॅश्टन अगर, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
हे देखील वाचा-