(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताविरोधात सामन्याआधी बाबर आझमने हुंकार भरली, काय म्हणाला पाकिस्तानचा कर्णधार....
Babar Azam On IND vs PAK, Asia Cup 2023 : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
Babar Azam On IND vs PAK, Asia Cup 2023 : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला होणार आहे. रविवारी कोलंबोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. या लढतीआधीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यानंतर बाबर आझम याने हुंकार भरली आहे. भारताविरोधात आम्ही 100 टक्के देण्यास सज्ज असल्याची प्रतिक्रिया बाबर आझम याने दिली आहे.
काय म्हणाला बाबर आझम -
कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्याबद्दल बोलताना बाबर म्हणाला की, मोठ्या सामन्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. भारताविरोधात होणाऱ्या पुढील सामन्यासाठी आम्ही 100 टक्के देऊ.
Babar Azam said, "we are always ready for a big match. We will give our 100% in the next match against India". pic.twitter.com/9MMbt0OPvt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 7, 2023
पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याचा भारत कसा सामना करणार -
सुपर 4 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानसोबत दोन हात करणार आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची परीक्षा असेल. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ बाद केला होता. आता रविवारी होण्याऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजीचा भारतीय संघ कसा सामना करतो.. हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
आशिया चषक स्पर्धेत हॅरिस रौफ याने आतापर्यंत नऊ विकेट घेतल्या आहेत. तर नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी सात सात विकेट घेतल्या आहेत. आशिया चषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये पाकिस्तानचे हे तिन्ही गोलंदाज पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
पहिल्या सामन्यात काय झालं होतं ?
शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा पाऊस -
Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.