Chess World Cup : आर. प्रज्ञानानंदने रचला इतिहास! बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू
Rameshbabu Praggnanandhaa : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाने सोमवारी फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या (FIDE World Cup Chess Tournament) अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला.

मुंबई : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद (Rameshbabu Praggnanandhaa) याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या बुद्धीबळपटूचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (FIDE World Cup Chess Tournament) मजल मारली आहे. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरत प्रज्ञानानंदने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाने सोमवारी फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला. अवघ्या 18 वर्षांच्या ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदकडे आता सर्वांच्या नजरा आहेत.
प्रज्ञानानंदची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
प्रज्ञानानंदने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा (Fabiano Luigi Caruana) टायब्रेकरमध्ये 3.5-2.5 असा पराभव केला. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रज्ञानानंदचा सामना आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. अंतिम फेरीत विजय मिळवत नवा इतिहास रचण्यापासून तो फक्त एक पाऊल दूर आहे.
आर. प्रज्ञानानंदने रचला इतिहास
भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. या विजयासह प्रज्ञानानंदने 2024 कँडिडेट्स स्पर्धेच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे. बॉबी फिशर आणि मॅग्नस कार्लसन यांच्यानंतर कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारा प्रज्ञानानंद हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हे आतापर्यंत कँडिडेट्सच्या स्पर्धेत खेळलेले एकमेव भारतीय आहेत. त्यानंतर आता प्रज्ञानानंदने कँडिडेट्स स्पर्धेतही धडक मारली आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ
आर. प्रज्ञानानंद मूळचा चेन्नईचा असून सध्या तो 18 वर्षांचा आहे. 2018 मध्ये प्रज्ञानानंदने ग्रँडमास्टर किताब पटकावला. प्रज्ञानानंदने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर बनण्याचा इतिहास रचला. प्रज्ञानानंद वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ खेळत आहे.
बहिणीकडून बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा
प्रज्ञानानंदला बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा त्याची बहिण वैशालीपासून मिळाली. प्रज्ञानानंदच्या वडीलांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वैशालीने टीव्हीवर कार्टून कमी पाहावं, यासाठी आम्ही तिला बुद्धीबळ शिकवलं. तिला पाहून प्रज्ञानानंदही खेळू लागला. त्यानंतर दोघांनाही बुद्धीबळ खेळ आवडला आणि दोघंही खेळू लागले. त्यांनी त्यातच करिअर करायचं ठरवलं आणि त्यांना यशही मिळालं म्हणून आम्ही आनंदी आहोत.
चार भारतीय उपांत्यपूर्व फेरीत
या वर्षी बुद्धीबळ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच चार भारतीय खेळाडूंनी प्रवेश केला होता. प्रज्ञानानंदसोबत अर्जुन एरिगाईसी, डी गुकेश आणि विदित गुजराथी यांनी अंतिम आठमध्ये स्थान मिळवलं होतं.
महत्वाच्या इतर बातम्या :
Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
