एक्स्प्लोर
Advertisement
सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या जिद्दीची कहाणी
मुंबई : पीव्ही सिंधूने आज भारतीय बॅडमिंटनला नव्या शिखरावर नेलं आहे. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच सिंधू आज ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचू शकली. जाणून घेऊयात भारतीय बॅडमिंटनच्या या नव्या नायिकेची कहाणी....
“रिओमधून पदक घेऊनच येईन”
रिओमधून पदक घेऊनच येईन, ऑलिम्पिकला रवाना होण्याआधी पीव्ही सिंधूने आपले इरादे स्पष्ट केले होते. वयाच्या आठव्या वर्षापासून सिंधूने ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पाहिलं आणि ते आता पूर्णही केलं आहे.
व्हॉलीबॉलपटू दाम्पत्याची कन्या : पीव्ही सिंधू
पुसराला वेंकट सिंधूची आणि तिच्या आई-वडिलांची पंधरा वर्षांची तपश्चर्य़ा आज फळाला आली आहे. पीव्ही रमण आणि पी विजया या भारताच्या माजी व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. त्यामुळं सिंधूला घरातूनच खेळाचं बाळकडू मिळालं. 2001 साली पुलेला गोपीचंदनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेला विजय पाहून सिंधूला बॅडमिंटन खेळण्याची प्रेरणा मिळाली.
सरावासाठी दररोजी 56 किमी प्रवास
सुरूवातीला सिकंदराबादमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूनं इंडियन रेल्वे इंजीनियरिंग आणि दूरसंचार इन्स्टिट्यूटच्या बॅडमिंटन कोर्टवर सराव केला. मग ती पुलेला गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली सराव करू लागली. त्या काळात सिंधूचे वडील तिला रोज 56 किलोमीटर दूर अॅकडॅमीत सरावासाठी घेऊन जायचे. सिंधूमधली मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द त्याही वयात उठून दिसायची.
... आणि सिंधूने भारतीय बॅडमिंटनचं कोर्ट गाजवायला सुरुवात केली!
ज्या काळात सायनाने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा निर्माण करायला सुरूवात केली, त्या काळात सब ज्युनियर आणि ज्युनियर स्तरावर विजेतपदं मिळवून सिंधूने भारतीय बॅडमिंटनचं कोर्ट गाजवायला सुरूवात केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंधूची कारकीर्द
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधूचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते 2012 साली तिनं आशियाई ज्युनियर विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तेव्हा. मग 2013 मध्ये ग्वांग्झू इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं कांस्यपदक पटकावलं. महिला एकेरीत बॅडमिंटनचं कांस्यपदक पटकावणारी सिंधू पहिलीच भारतीय ठरली होती. त्याआधी केवळ प्रकाश पडुकोण यांनी पुरुष एकेरीत आणि ज्वाला गुट्टा अश्विनी पोनप्पानं महिला दुहेरीत कांस्यपदक मिळवलं होतं.
ग्रांप्री गोल्ड स्पर्धांमध्ये सिंधूला पाच विजेतेपदं
2014 मध्ये कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत सिंधूनं पुन्हा कांस्यपदक मिळवलं. 2014 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंधूनं पुन्हा महिला एकेरीचं कांस्यपदक मिळवलं. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ग्रांप्री गोल्ड स्पर्धांमध्ये सिंधूनं पाच विजेतेपदं मिळवली आहेत.
ऑलिम्पिकमध्ये जपानच्या वर्ल्ड नंबर सिक्स नोझोमी ओकुहाराचा पराभव
यंदा ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आपल्यापेक्षा रँकिंगमध्ये वरचढ असलेल्या खेळाडूंवर मात केली आहे. सिंधूनं सेमी फायनलमध्ये जपानच्या वर्ल्ड नंबर सिक्स नोझोमी ओकुहाराला हरवलं. त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत तिनं चीनच्या वांग यिहानला हरवलं होतं आणि बॅडमिंटन कोर्टवर चीनच्या वर्चस्वाला तडा दिला होता. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठेपर्यंत सिंधूनं केवळ एकच गेम गमावला आहे.
एकीकडे सायना नेहवालला दुखापतींनी सतावल्यानं ऑलिम्पिकची साखळी फेरी पार करता आली नाही. पण सिंधूनं पदकाची कमाई करून बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवत ठेवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
क्राईम
मुंबई
मुंबई
Advertisement