भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
उत्रे गावातील या घटनेत भाचीने मामाच्या मर्जीविरोधात आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले अन् त्यांनतर गावातून लग्नाची वरात ही काढली होती.
कोल्हापूर : आपल्या भाचीने मर्जीविरोधात लग्न केले म्हणून चक्क मामानेच भाचीच्या स्वागत सभारंभ कार्यक्रमाच्या जेवणात विषारी (Poison) औषध टाकण्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. महेश ज्योतीराम पाटील असे मामाचे नाव असून जेवणात विष टाकताना मामा आणि आचाऱ्याची झटापट झाली. परंतु, गोंधळ उडण्यापूर्वीच मामाने पळ काढला. सुदैवाने आचाऱ्यासमोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचे निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. भाची लहानपणापासूनच मामा महेश पाटील यांच्याकडे राहायला होती. उत्रे गावातीलच एका तरुणाशी तिचे प्रेम जुळले होते, पण ही गोष्ट तिच्या मामाला पसंत नव्हती. महिन्याभरापूर्वी मुलाकडून मामाकडे भाचीसाठी मागणीही घालण्यात आली होती. मात्र, मामाने स्पष्ट शब्दात लग्नास विरोध केला होता. याच वादातून आपल्या मर्जीशिवाय लग्न करत असल्याने भाचीच्या लग्नातच घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या मामा फरार असून पोलिसांकडून (Police) मामाचा शोध घेण्यात येत आहे.
उत्रे गावातील या घटनेत भाचीने मामाच्या मर्जीविरोधात आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले अन् त्यांनतर गावातून लग्नाची वरात ही काढली होती. याच बदनामीचा राग मामाच्या मनात होता. दरम्यान, लग्नानंतर नवऱ्या मुलाकडील मंडळींनी मंगळवारी एका हॉलमध्ये स्वागत सभारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. भाचीने मर्जीविरोधात लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच सकाळी 11.15 च्या सुमारास मामा महेश हातात विषारी औषधाची बाटली घेऊन हॉलमध्ये आला. त्यांनतर त्याने बाटलीतील औषध पाहुणे मंडळी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या अन्नावर फेकायला सुरुवात केली. त्याचवेळी तिथे असणाऱ्या आचाऱ्याने हा प्रकार पाहताच मामाला विरोध केला. त्यात दोघांची झटापटही झाली अन् मामाने स्वयंपाकघरातून पळ काढला. अन्नात औषध फेकल्याची वार्ता हॉलमध्ये समजल्यावर लग्न कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जेवणाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले
दरम्यान, जेवणाचे सॅम्पल, विषारी पदार्थ घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले असून केमिकल अनालयजरकडे पाठवण्यात आले आहेत. मामाने मिसळलेला विषारी पदार्थ कोणता होता, त्यापासून मनुष्याला हानी होती का, किती हानी होती?, यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. तर, आरोपी मामाची गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली.