Asian Games 2023 Medal Tally: दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने, आतापर्यंत भारताने किती पदके जिंकली
Asian Games 2023 India Medal Tally : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची भारताची सुरुवात सुवर्णपदकाने झाली.
Asian Games 2023 India Medal Tally : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची भारताची सुरुवात सुवर्णपदकाने झाली. दुसऱ्या दिवशी भारताने आतापर्यंत पाच पदकावर नाव कोरलेय. पहिल्या दिवशी, रविवारी भारताने एकूण पाच पदके पटकावली होती. आतापर्यंत भारताच्या नावावर दहा पदके झाली आहेत. दुसऱ्या दिवशी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले, जे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक होते. त्यानंतर 4 सदस्यीय रोइंग संघाने भारताला ब्राँझ पदक जिंकून दिले. सध्या भारतासाठी दुसरा दिवस चांगलाच गेला. देशाला दुसऱ्या दिवशी 5 पदके मिळाली आहेत. क्रिकिटेमधील एक पदकही निश्चित आहे.
पहिल्या दिवशी भारताने पाच पदके जिंकली होती. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आणखी 5 पदकांची भर घातली आहे. दुसऱ्या दिवसाचे पहिले पदक पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने जिंकले. ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांकेश आणि दिव्यांश यांचा रायफल संघात समावेश होता. त्यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.
त्यानंतर पुरुषांच्या रोइंग संघाने भारतासाठी दुसरे पदक जिंकले. यावेळी देशाला कांस्यपदक मिळाले. या रोइंग टीममध्ये भीम, पुनीत जसविंदर आणि आशिष यांचा समावेश होता.
भारताला तिसरे पदकही रोइंगमधूनच मिळाले. मेन्स क्वाडरपल्समध्ये भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
दुसऱ्या दिवसाचे चौथे पदक शुटिंगमध्ये मिळाले. ऐश्वर्य प्रताप सिंह याने शूटिंगमध्ये पदक मिळवले. ऐश्वर्याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले.
दिवसातील पाचवे पदक 25 मीटर रॅपिड फायरमध्ये मिळाले. विजयवीर सिद्धू, अनिश भानवाला आणि आदर्श सिंग यांच्या संघाने भारताला २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करण्याबरोबरच कांस्यपदक पटकावले आहे.
दहा पदकांसह भारत सहाव्या क्रमांकावर -
आतापर्यंत भारताकडे एक सुवर्ण, 3 रौप्य आणि सहा कांस्य पदके आहेत. दहा पदकासह भारत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. यजमान चीन 45 पदकांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कोरिया 18 पदकांसह दुसऱ्या, जपान 20 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे (कारण सुवर्ण कमी आहे), उझबेकिस्तान आणि हाँगकाँग 10-10 पदकांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
क्रिकेटमध्ये पदक पक्के -
महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यामध्ये फायनलचा सामना सुरु आहे. भारताचे एक पदक निश्चित मानले जातेय. भारतीय संघ मजबूत असल्यामुळे सर्वांनाच सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना एक बाद ६२ धावसंख्यापर्यंत मजल मारली आहे. स्मृती मंधाना लयीत दिसत आहे.