Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन
Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले.
Khelo India Youth Games 2023 : खेलो इंडिया या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत यानं सुवर्ण कामगिरी केली आहे. वेदांत याने या स्पर्धेत पाच सुवर्ण व दोन रौप्य अशी एकूण सात पदके जिंकली. अभिनेता आर. माधवन यानं ट्वीट करत आपल्या लेकाचं कौतुक केले आहे.
महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी 2019 पुणे आणि 2020 आसाम येथेही महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलं होतं. वेदांत माधवन यानं उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांत सात पदकं जिंकली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. आर. माधवन यानं ट्वीट करत आपल्या लेकाचं कौतुक केले आहे. माधवन याने स्वत:च्या मुलासोबतच या स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या अपेक्षा फर्नांडिस हिचेही कौतुक केलेय. त्यासोबतच कोच आणि इतर स्टाफचं कौतुक करायला माधवन विसरला नाही.
आर माधवन याचं ट्वीट-
VERY grateful & humbled by the performances of @fernandes_apeksha ( 6 golds,1 silver,PB $ records)& @VedaantMadhavan (5golds &2 silver).Thank you @ansadxb & Pradeep sir for the unwavering efforts & @ChouhanShivraj & @ianuragthakur for the brilliant #KheloIndiaInMP. So proud pic.twitter.com/ZIz4XAeuwN
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
वेदांतचा खेलो इंडियात जलवा, सात पदके कशी जिंकली?
जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच वेदांत याने मिळविलेल्या सुवर्णपदकाने झाली होती. वेदांत याने 200 मीटर फ्रीस्टाईलचे अंतर एक मिनिट 55.39 सेकंदात पार केले होते. गतवर्षी डॅनिश खुल्या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवणाऱ्या वेदांतने येथे सुरुवातीपासूनच फ्रीस्टाईलचे अप्रतिम कौशल्य दाखवीत ही शर्यत सहज जिंकली. वेदांत हा प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन यांचा मुलगा असून त्याने जलतरणातच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सुरुवातीपासून त्याच्या पालकांकडून सातत्याने सहकार्य मिळाले आहे. वेदांत माधवन याने दुसरे सुवर्णपदक नोंदविताना पंधराशे मीटर फ्री स्टाईल शर्यतीत निर्विवाद यश मिळविले. वेदांत याने दुसऱ्या दिवशी पंधराशे मीटर्स शर्यतीत पहिल्यापासूनच आघाडी घेत सहजपणे विजेतेपद पटकाविले. त्याला हे अंतर पार करण्यास 16 मिनिटे 16.74 सेकंद वेळ लागला.
वेदांत याने तिसऱ्या दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. शंभर मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत सोनेरी कामगिरी करताना त्याने 52.97 सेकंद अशी वेळ नोंदवली. त्याने या शर्यतीत सुरुवातीपासूनच साधारणपणे वीस ते पंचवीस मीटरची आघाडी घेतली होती. त्याला चारशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत मात्र सोनेरी यशाने हुलकावणी दिली. ही शर्यत त्याने चार मिनिटे 09.61 सेकंदात पार करीत रौप्य पदक पटकाविले. चौथ्या दिवशी मुलांच्या आठशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत वेदांत माधवन याचे सुवर्णपदक हुकले. त्याने हे अंतर आठ मिनिटे 31.12 सेकंदात पार केले आणि रूपेरी कामगिरी केली. पाचव्या दिवशी वेदांत याने पाचव्या सूवर्णपदकावर नाव कोरलं. वेदांत माधवन याने रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेतील स्वतःचे पाचवे सुवर्णपदक पटकाविले.