Nagpur News: नागपुरात सरसंघचालकांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन; संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं
Nagpur News: सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी राम मंदीराविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले आहे.
Nagpur News : 'अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वात नागपूरातील देवडिया काँग्रेस भवनमधून निघून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र विनापरवानगी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्यापासून पोलिसांनी मध्येच रोखले आहे.
संघाने आधी ध्वजाचा अवमान केला. आता स्वातंत्र्याचा अपमान करत आहे, अशा आशयाचे बॅनर्स घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी संघावर बंदी घाला, अशी मागणीही युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केली. यावेळी गोंधळ होण्याची शक्यता लक्ष्यात घेता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी चिटणीस पार्क चौकावर आधीपासूनच जोरदार बंदोबस्त लावला होता. दरम्यान युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते जास्त संख्येने असल्याने समोर जात होते. अशातच कार्यकर्ते ऐकत नसल्याचे बघून पोलिसांनी ही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, हेही उपस्थित होते. तर यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र पोलिसांनी परिस्थितिवर नियंत्रण मिळवत आता परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.
संघावर बंदी घाला, युवक काँग्रेसची मागणी
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी देशविरोधी वक्तव्य करून, सरदार भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादिसह अनेक क्रांतिकारकांचा अवमान केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांनी केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या अपमाना विरोधात युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरली आहे. या पूर्वी ही केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या थोर महापुरूषांचा अवमान केला आहे. या वक्तव्याचे आम्ही निषेध करतो आहे. तसेच संघावर बंदी घालावी अशी आमची मागणी असल्याची ही प्रतिक्रिया प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या