BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
BJP : भाजपच्या अध्यक्षपदाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार याबाबत वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जनता पार्टीला पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार याबाबत वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की बिहार विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल, असं राजनाथ सिंह म्हणाले.पार्टीमध्ये या संदर्भात कोणताही वाद नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाबाबत ऐकायला मिळेल. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या राजकीय निर्णयांवर संघाचा प्रभाव असल्यासंदर्भातील चर्चा त्यांनी फेटाळल्या. राजनाथ सिंह म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधीही भाजपच्या राजकीय कार्यात हस्तक्षेप करत नाही. लहानपणापासून आरएसएसशी जोडलेला असून संघ देशभक्तीचे संस्कार देतं, असं राजनाथ सिंह म्हणाले.
Rajnath Singh on BJP President : पक्षाला 12 वा अध्यक्ष मिळणार : राजनाथ सिंह
भाजपचा नवा अध्यक्ष हा 12 वा राष्ट्रीय अध्यक्ष असेल. जेपी नड्डा 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्ष झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये जे.पी. नड्डा अध्यक्ष झाले. जे.पी. नड्डा आता केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि रसायन आणि उर्वरक मंत्री आहेत.तेव्हापासून भाजपकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध घेत आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ एनडीएचा विजय होईल, असं म्हटलं. जनतेचा प्रतिसाद पाहता आमचं सरकार पुन्हा सत्तेत येईल. आम्हाला दोन तृतियांश बहुमत मिळेल, असं राजनाथ सिंह म्हणाले. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वात लढत आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान 64.66 टक्के मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. बिहारमध्ये भाजप-जदयू यांच्या एनडीएसमोर राजद- काँग्रेसच्या महागठबंधनचं आव्हान आहे.

























