Yavatmal Rain : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी, नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे मोठं नुकसान
Yavatmal Rain : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळं नाल्याला आलेल्या पुरामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे.
Yavatmal Rain : राज्याच्या काही भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) थैमान घातलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळं नाल्याला आलेल्या पुरामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. राळेगाव, मेंगापूर, वाऱ्हा, बोरी, आष्टा या भागातील शेतातून पूराचं पाणी गेल्यानं अंदाजे 200 हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तुरीचे पीक जलमय झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी
यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळं शेती पिकांचेही नुकसान झालं आहे. जमिनीही खरडून गेल्या आहेत. दरवर्षी शेतकरी राळेगावमधील नाल्याचे सरळीकरण करण्याची मागणी करतात. मात्र, याकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ही परिस्थिती ओढवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वाऱ्हा आणि बोरी मेंगापूर पुलावरून पाणी गेल्याने संपूर्ण शिवार जलमय झाला आहे. याठिकाणी नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याचे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागच्या वर्षी सुद्धा या भागात अरुंद नाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
यवतमाळ-नेर महामार्ग बंद
मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा प्रमाणात पूर आलेला आहे. अशातच यवतमाळ-नेर मार्गावरील लासीनजवळ असलेल्या दोन्ही नाल्यांना पूर आल्यानं यवतमाळ-नेर हा महामार्ग पूर्णतः बंद झाला आहे. यवतमाळ रस्ता लासीनाजवळ पुरामुळे बंद झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रेड अलर्ट दिला होता.
अडान नदीला पूर
यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडान नदीला पूर आला आहे. त्यामुळं बोरीअरब जवळच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळं यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता त्या ठिकाणी बरेकेट्स लावण्यात आली आहेत. पाणी पुलावरुन वाहत असताना कोणी यावरुन जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
विदर्भात रेड अलर्ट
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हा सुट्टीचा आदेश रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यात देण्यात आला आहे. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: