Yavatmal: बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत घोटाळा; चुकीच्या खात्यात कर्ज वाटप केल्याने बँक अधिकाऱ्यांकडून 97 कोटी वसुलीचे आदेश
Maharashtra News: यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील काही मंडळींनी चुकीच्या खात्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले, त्याचा परिणाम आता त्यांना भोगावा लागतोय.

Yavatmal: एखाद्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळ किंवा अधिकाऱ्यांनी चुकीचे कर्ज वाटप करून बँकेला आर्थिक अडचणीत आणलं, तर त्यांच्याकडून छोटी मोठी रक्कम वसूल केल्याचे प्रकरण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या प्रकरणात तत्कालीन अध्यक्षा विद्या केळकर यांच्याकडून तब्बल 55 कोटी, तर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन यांच्याकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय इतर 7 संचालक आणि 7 अधिकाऱ्यांकडून 17 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश अप्पर निबंधक पुणे शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत. चुकीचे कर्ज वाटप करून बँकेला शेकडो कोटी रुपयांच्या NPA च्या फेऱ्यात अडकवल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँक 1994-95 मध्ये स्थापन झाली होती. 2013 वर्षापर्यंत ही बँक नीट चालत होती. मात्र, 2013 पासून बँकेच्या संचालक मंडळामधील काही लोकांनी 267 कोटी 40 लाख रुपयांचं चुकीचे कर्ज वाटप करणं सुरू केलं. मात्र, ज्यांना कर्ज दिलं त्या कर्जदारांनी ही रक्कम कधीच भरली नाही, त्यामुळे या रकमेवरील व्याज 208 कोटी 13 लाखांपर्यंत गेलं आणि मुद्दल व्याज मिळून ही रक्कम 475 कोटी झाली आहे.
सहकारी संस्थेचे (पुणे) अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांच्याकडून अध्यक्षांसह 7 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवरील वसुली निर्देशामुळे बँकेच्या ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकांनी आपला घामाचा, सेवानिवृत्तीचा पैसा बँकेत डिपॉझिट केला आहे, त्यामुळे ही रक्कम मिळावी, अशी ठेवीदारांची अपेक्षा आहे. मात्र, हे निर्देश केवळ आदेशापुरते मर्यादित न राहता याची अंमलबजावणी होऊन ठेवीदारांची रक्कम परत मिळाली पाहिजे, अशी मागणी ठेवीदार करत आहेत.
यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून (RBI) 9 नोव्हेंबर 2022 मध्ये रद्द झाला. 11 नोव्हेंबर 2022 रोजी अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक यांची नियुक्ती करण्यात आली. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (DICJC) 300 कोटींचा क्लेम मंजूर करण्यात आला. बँकेला ठेवीदारांचे 185 कोटी 36 हजार 500 रुपये देणे बाकी आहे.
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेने अधिकाऱ्यांकडून 31 मार्च 2023 पर्यंत 16 कोटी 33 लाखांची वसुली केली आहे. तर, पुणे अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी अधिकाऱ्यांकडून जून 2023 पर्यंत 97 कोटी वसूल करण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.
हेही बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
