Yavatmal Crime: माता न तू वैरिणी! यवतमळामध्ये आईने पोटच्या मुलाची केली हत्या, पाच लाखाची दिली सुपारी
Yavatmal Crime: आईने आपल्याच नातेवाईकांसोबत काळजाचा तुकडा असलेल्या मुलाची हत्या करण्याचा कट रचला. हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली.
यवतमाळ: व्यसनाधीन असलेल्या आपल्याच मुलापुढे हतबल झालेल्या स्वतःच्या आईनेच काळजाचा तुकडा असलेल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नातेवाईकांना सुपारी देऊन त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मन सुन्न करणारी घटना चौसाळा जंगल (Yavatmal Crime) परिसरात घडली. लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत या प्रकरणाच्या मुळात जाऊन दोन महिला सह चार जणांना बेड्या ठोकल्या.
योगेश विजय देशमुख असे या (25) हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणात असलेली मृतकाची आई वंदना देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी त्याचा मुलगा लखन चौधरी यांनी मारण्याचा कट रचला. तर सुपारी घेऊन योगेशची हत्या करणारे विकी भगत आणि राहुल पठाडे यांना लोहारा पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
योगेश देशमुख हा व्यसनाधीन झाला होता त्यामुळे तो स्वतःच्या आईला नेहमी त्रास देत असे. अशातच त्याच्या त्रासाला कंटाळून हातबल झालेल्या आईने आपल्याच नातेवाईकांसोबत काळजाचा तुकडा असलेल्या मुलाची हत्या करण्याचा कट रचला. हत्येसाठी पाच लाख रुपये सुपारी देण्याचे कबुल करून मारेकऱ्यांना दोन हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. दोघांनी यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौसाळा जंगल परिसरात नेऊन योगेशचा गळा आवळला. मात्र त्याचा मृत्यू होत नसल्याने त्याच्यावर दगडाने प्रहार करून जीवानिशी मारले. त्यानंतर जंगलात दहा ते बारा दिवस त्याचा मृत्यू दिवस कुजलेल्या अवस्थेत पडून होता.
बरेच दिवस उलटूनही मारेकऱ्यांना त्याच्या आईने पैसे न दिल्याने मारेकऱ्यांनी स्वतः पोलिसांना 112 नंबर वर कॉल करून मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. त्यावरून लोहारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जलद गतीने तपास चक्र फिरवत मारेकरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आईने सुपारी दिल्याची कबुली देत आम्ही मारल्याची कबुल केले त्यावरून लोहारा पोलिसांनी दोन महिलेसह चौघांना गजाआड केले.
यवतमाळ जिल्हा गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल
एकंदरीतच जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून एका मागून एक होत असलेल्या हत्याच्या घटनांमुळे यवतमाळ शहर पूर्णतः हादरून गेले आहेत. आता यवतमाळ जिल्हा पोलीस दलासमोर अशा घटनांवर रोख लावण्याचे आव्हान आहे. यवतमाळ जिल्हा गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल ठरला जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ जिल्हा गुन्हेगारीत सर्वात वरच्या लिस्टवर आहे. या सर्व घटनामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले.