State Excise Department Raid : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; स्पिरिटपासून बनावट दारुची निर्मिती करणारी टोळी गजाआड
Yavatmal Crime News : यवतमाळच्या तारपुरा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. यामध्ये तीन आरोपी, मुद्देमालसह स्पिरिट पुरवठा करणाऱ्या एका आरोपी अटक करण्यात आली.
Yavatmal News : स्पिरिटपासून बनावट देशी दारू निर्मिती करण्याऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या तारपुरा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. तारपुरा परिसरातील एका घरात स्पिरीटपासून बनावट देशी दारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून धाड टाकण्यात आली. यामध्ये तीन आरोपी आणि मुद्देमालसह स्पिरिट पुरवठा करणाऱ्या एका आरोपी अटक करण्यात आली.
बनावट दारूसाठी स्पिरिट ब्लीचिंग पाउडरचा वापर
स्पिरिट पासून अल्पदरात बनावट दारू बनवून त्यातून झटपट पैसा कामविणाऱ्या चार आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक एस.एन.भटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारू तयार करण्यासाठी स्पिरिटचा वापर करत होते. स्पिरिटचा जांभळा रंग पांढरा करण्यासाठी स्पिरीटमध्ये ब्लीचिंग पाउडरचा वापर करण्यात येत होता. ही बनावट दारू आरोग्यास अतिशय घातक असून त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात. शिवाय या बनावट दारूचा देशाच्या महसूलवर देखील परिणाम होत असतो. आम्हाला सूत्राकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तारपुरा परिसरातील एका घरात धाड टाकली. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बनावट देशी दारूसह मुद्देमाल आढळून आला. या धाडीमध्ये 90 एमएलच्या आणि 180 एमएलच्या दिडशे बॉटल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी विक्की राजेश जयस्वाल (33) रा. तारपुरा, देवानंद सोनबा आडे (44) रा. डोर्ली, डोळंबा, विशाल राजेश जयस्वाल (33) रा. शिंदेनगर तसेच स्पिरीट पुरवठा करणार जयस्वाल नामक इसमाला अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात बनावट दारूचा सुळसुळाट
कारखान्यात बनणाऱ्या दारूमध्ये उत्तम दर्जाचे स्पिरिट वापरले जाते. या स्पिरिटवर योग्य प्रक्रिया करून सर्व प्रमाण शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवले जाते. यासाठी स्वतंत्र ब्लेंडर आणि टेस्टरची व्यवस्था असते. शिवाय कारखान्यातून येणाऱ्या दारूची विशेष अशी पॅकेजिंग सिस्टिम असते. मात्र, बनावट दारू तयार करणाऱ्या लोकांना ही पॅकेजिंग सिस्टिमचा अनुभव नसल्याने त्याची नक्कल होते. प्रामुख्याने बनावट दारू आणि कारखान्यातून येणाऱ्या दारूच्या बाटलीचे झाकण बॅच क्रमांक, लेबल यात फरक असतो. असे असले तरी प्रामुख्याने ग्रामीण भागात या बाबत फारशी माहिती नसल्याने अशा बनावट दारू तयार करणाऱ्यांचा गोरखधंदा जोरात सुरू असतो.
हे ही वाचा