Yavatmal News : यवतमाळमध्ये देशातील एकमेव सीतामातेचे मंदिर; सीतामातेच्या मूर्तीची पुर्नप्रतिष्ठापना
Sita Mata Mandir : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांववरून दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर असलेले रावेरी या गावाला पौराणिक इतिहास लाभलेला आहे. भारतातील एकमेव सीता मंदिर याच ठिकाणी आहे.
यवतमाळ : एकीकडे अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) आज अक्षय पुजनाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे देशातील एकमेव सीतामातेच्या (Sita Mata) यवतमाळच्या (Yavatmal) रावेरी (Raveri) येथील मंदिरात सीता मातेच्या मूर्तीची पुर्नप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील माती आणि रामायणात उल्लेख असलेल्या तमसा नदीचे (रामगंगा) जल, जगातील एकमेव भव्यदिव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणी करीता पाठविण्यात आली होते.
काय आहे या मंदिराचा इतिहास?
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांववरून दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर असलेले रावेरी या गावाला पौराणिक इतिहास लाभलेला आहे. भारतातील एकमेव सीता मंदिर आहे. ज्यावेळी श्रीरामाने माता सीतेला वनवासात सोडले होते, तेव्हा सीतेचे वास्तव्य याच दंडकारण्याच्या भागात होते. येथेच लव-कुशचा जन्म झाला होता. आपले शिक्षण याच ठिकाणी श्री वाल्मिकी ऋषिच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. प्रभू श्रीरामाने रामाने अश्वमेघ यज्ञाचा घोडा संपूर्ण भारतवर्षात सोडला. तो घोडा लव-कुशांनी याच ठिकाणी अडविला होता. तेव्हा श्री रामांनी हनुमानजी यांना वानर सैन्यासह पाठविले. तेव्हा लव-कुशानी हनुमानजींना बांधून ठेवले. ते हनुमानजी या ठिकाणी आजही बांधलेल्या स्थितीत आहे.
तसा वनवास कोणालाच नको...
सीतमातेचे हे मंदिर सर्वच महिलांचे प्रतीक आहे. जो वनवास सीतामातेच्या वाटेला आला. तसा वनवास कुठल्याही महिलेच्या वाट्याला येऊ नये. येथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला असे वाटले पाहिजे की आपल्या पत्नीला सांभाळले पाहिजे. या ठिकाणावरून महिला आणि पुरुषांना प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जाते.
शेतकरी नेते शरद जोशी यांनी घेतला होता मेळावा...
या कार्यक्रमाला शेतकरी चळवळीतील खासदार मान हे पंजाबवरून या ठिकाणी आले. शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी यांनी या ठिकाणी मोठा मेळावा घेतला होता. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तेथूनच हे मंदिर प्रकाश झोतात आले. त्यामुळे या ठिकाणी सीता मातेचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे पंजाबचे खासदार मान यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असताना महाराष्ट्रतील यवतमाळ च्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीतामाता मंदिरात सीतामातेच्या मुर्तीची पुनर्स्थापना होत असल्यांने हे गाव प्रकाशझोतात आले आहे.