Republic Day Parade 2023 : प्रजासत्ताकदिनी राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथात झळकणार यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे
Yavatmal News : राजपथावर साडे तीन शक्तिपीठ आणि नारी शक्ती या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळच्या पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ येणगुटीवार यांनी तयार केली आहेत.
Yavatmal News : राजधानी दिल्लीत राजपथावर (Rajpath) उद्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade) महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठ आणि नारी शक्ती या विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableaux) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली असून पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ येणगुटीवार यांनी तयार केली आहेत. त्यामुळे यवतमाळच्या पाटणबोरीचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ आणि नारीशक्तीचे चलचित्र
दरवर्षी राजधानीत वेगवेगळ्या प्रांताचे चित्ररथ सहभागी होत असतात. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश असतो. यंदा महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहुर आणि वणी इथल्या देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे राजपथावरील पथसंचलनात होणार आहे. त्यासाठी साडेतीन शक्तिपीठांच्या देवी आणि अन्य शिल्प साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्ररथाच्या देखव्यात साकारण्यात आलेली सर्व शिल्प यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या पाटणबोरी इथल्या यशवंत येणगुटीवार या शिल्पकाराने साकारली आहेत.
दहा दिवसांत शिल्प साकारली
साडेतीन शक्तिपीठच्या चित्ररथामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नाशिकची सप्तशृंगी माता आणि माहूरची रेणुका माता यांचे शिल्प साकारण्यात आले आहेत. शिवाय देवीसमोर गोंधळ करणारे गोंधळी ज्यामध्ये पोतराज, हलगीवाला, जोगवा मागणारे आणि इतर दहा शिल्प चित्ररथामध्ये दिसणार आहेत. बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली आहेत. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहेत. याकरता नीरज, पिंटू, निखिल, सुरज, अरुण, अक्षय, अविनाश, आकाश आदींचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे यशवंत सांगत आहे.
यंदा 23 चित्ररथ राजपथावर
26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचं दर्शन घडवणारी 13 राज्यांची, चार केंद्रशासित प्रदेशांची आणि सहा विविध मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ दिसतील.
राजपथावरील परेडदरम्यान आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे तसंच जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.
संस्कृतिक मंत्रालय, गृह मंत्रालय (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल), गृह मंत्रालय (अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो), गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग), आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (भारतीय परिषद कृषी संशोधन) अशा एकूण सहा मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील परेडमध्ये दिसतील. ज्यामध्ये गेल्या काही वर्षांतील त्यांची कामं आणि कामगिरी दिसेल.
संबंधित बातमी