XI Jinping: चीनच्या राष्ट्रपतीपदाची शी जिनपिंग घेणार तिसऱ्यांदा शपथ; विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
चीनची राजधानी बीजिंगसह अतिसंवेदनशील शहरांमध्ये प्रत्येक 100 फुटांवर एक पीएलए जवान तैनात आहे. चीनमध्ये 1.4 दशलक्षाहून अधिक संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण चीन एका बालेकिल्ल्यात बदलला आहे.
China Most Powerful leader Xi Jinping: चीनच्या सरकारचे सर्वेसर्वा अर्थात शी जिनपिंग हे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर चीनला छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. एखादी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष पदावर दोनदाच राहू शकते. चीनमधून हा नियम 2018 साली बाद झालाआणि शी जिनपिंग यांचा तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला. शी जिनपिंग आता तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. पण त्यांच्या शपथविधीमुळे चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे
जिनपिंग यांना होणारा विरोध
काही दिवसांपूर्वी बीजिंगच्या रस्त्यावर जिनपिंग यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळेच की काय शी जिनपिंग यांना भीती वाटत असावी. त्यामुळेच चीनला छावणीचं स्वरुप आलंय अमेरिकन मीडियाचा दावा आहे की, चीनची राजधानी बीजिंगसह अतिसंवेदनशील शहरांमध्ये प्रत्येक 100 फुटांवर एक पीएलए जवान तैनात आहे. चीनमध्ये 1.4 दशलक्षाहून अधिक संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण चीन एका बालेकिल्ल्यात बदलला आहे.
- प्रत्येक 100 फुटांवर एक पीएलए जवान तैनात
- 1.4 दशलक्षाहून अधिक संशयित ताब्यात
- प्रत्येक घडामोडींवर प्रशासनाची बारीक नजर
न्यूयॉर्क टाइम्सच्या या अहवालानुसार, पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना बीजिंगला काहीही मेल करणाऱ्या प्रत्येकाचे आयडी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत कम्युनिस्ट काँग्रेस पक्षाच्या मोठ्या सभा संपत नाहीत तोपर्यंत बारीक नजर असणार आहे. विरोध मावळलेला नसतानाच शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. जिनपिंग यांना आपल्या शपथविधी सोहळ्यात कुठलाही धोका नको आहे. म्हणूनच की काय चीनमध्ये सध्या जागता पहारा दिला जातोय.
चीनच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक अशीच होते
चीनच्या राष्ट्राध्यक्षाची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे 3000 प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये 200 सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील 25 सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष म्हणूनही निवड करतात.