कोरोना महामारीच्या उत्पत्तीचं कारण शोधण्यासाठी WHO वुहान दौऱ्यावर; चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
चीनमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये पुन्हा वेगाने वाढ होत आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेचं पथक चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोना महामारीच्या उत्पत्तीचं कारण जाणून घेण्यासाठी पथक चीनच्या वुहान शहराला भेट देणार आहे.
वुहान : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी कोरोना व्हायरस महामारीच्या उप्तत्ती प्रकरणी आपला तपास सुरु केला आहे. आज डब्ल्यूएचओमधील काही अधिकारी वुहान शहराचा दौरा करणार आहेत. वुहान शहरात 2019 मधील डिसेंबरमध्ये सर्वात आधी कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये पुन्हा वेगाने वाढ होत आहे. डब्ल्यूएचओमधील 10 सदस्यांचं पथक कोरोना महाामारीच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी वुहान शहराच्या दौऱ्यावर जात आहे. अशातच वुहानमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. असं सांगण्यात येत आहे की, डब्ल्यूएचओमधील तज्ज्ञांचं पथक सिंगापूरमधून वुहानसाठी रवाना होणार आहे.
डब्ल्यूएचओमधील तज्ज्ञांचा दौरा नेमका कसा असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून या दौरा होणार की, नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी गेल्या आठवड्यात चीनकडून दौऱ्याची रुपरेषा देण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असल्याचं सांगत निराशा व्यक्त केली होती. चीनने सोमवारी डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची घोषणा केली. त्यानंतर टेड्रोस म्हणाले की, अनेक देशांचे वैज्ञानिक या दौऱ्यावेळी कोरोना व्हायरस सर्वात आधी मनुष्यापर्यंत कसा पोहोचला हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
टेड्रोस पुढे बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी वुहानमध्ये संशोधन सुरु करण्यात येणार आहे. चीनने स्वतंत्र तपासणीची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या प्रकरणातील सर्व अभ्यासांवर चीनकडून कठोर नियंत्रण ठेवलं जात आहे. चीनकडून सातत्यानं सांगितलं जात आहे की, कोरोना व्हायरस चीनमध्ये देशाबाहेरुन आलेला असू शकतो.
डब्ल्यूएचओच्या पथकाच्या चीन दौऱ्याआधी देशात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, मंगळवारी देशात संसर्ग झालेल्यांमध्ये 115 नवे कोरोना बाधित समोर आले. ज्यामध्ये 107 रुग्णांना स्थानिक स्तरावर कोरोनाची बाधा झाली आहे. तर इतर रुग्ण देशाबाहेरुन आलेल्या लोकांशी संबंधित आहेत. राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, राष्ट्रीय स्तरावर समोर आलेल्या प्रकरणांमध्ये 90 रुग्ण हेबेई प्रांतातील आणि 16 हेईलोंग जियांग प्रांतातील आहेत.
चीनमध्ये मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या 87,706 पोहोचली होती. तर 4,634 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता.