US Israel Iran War: अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं सर्वाधिक फायदा कोणत्या देशांना झाला? कमाई कोणाची वाढली?
US Israel Iran War: अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं जगभरातील भांडवली बाजार कोसळले असले तरी काही देशांना फायदा होत असल्याचं समोर आलं आहे.

US Israel Iran War नवी दिल्ली: अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. युद्धात सहभागी असलेल्या देशांना लष्करी कारवाई सुरु ठेवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करावे लागत आहेत. जगभरात भांडवली बाजारात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होत आहे. मात्र, याचवेळी काही देशांना युद्धामुळं फायदा होऊ लागला आहे. तेलाचे वाढते दर, शस्त्रांची वाढती मागणी आणि ऊर्जा पुरवठ्याचे मार्ग बदलल्यानं लढाईपासून दूर असलेल्या काही देशांसाठी आर्थिक कमाईची संधी निर्माण झाली आहे.
रशियाला सर्वाधिक फायदा
यूरोपियन यूनियनच्या काही विश्लेषकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मतानुसार रशियाला या युद्धाचा सर्वाधिक फायदा होत आहे. जागतिक स्तरावर तेल आणि गॅसचे दर वेगानं वाढले आहेत. आखाती देशांमध्ये तणाव वाढल्यानं कच्चा तेलाचे दर 100 ते 115 डॉलर प्रति बॅरल झालं आहे. रशिया जगभरातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्यातदारांपैकी एक देश आहे. यामुळं तेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याचा फायदा रशियाला होत आहे.
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळं भारत आणि चीन सारख्या देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलं आहे. यामुळं रशियाचं उत्पन्न वाढलं आहे. रशियाला अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं दुसरा एक फायदा झाला आहे, तो म्हणजे जगाचं लक्ष रशिया आणि यूक्रेन युद्धावरुन बाजूला गेलं. यामुळं त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय दबाव कमी झाला.
अमेरिकन शस्त्र कंपन्यांना मोठा फायदा
अमेरिकेकडून इराण विरोधात कारवाई करण्यासाठी इस्त्रायलला लष्करी कारवाईसाठी मदत करण्यासाठी मोठा खर्च केला जातोय. मात्र, त्यांच्या देशातील क्षेत्रांना मोठा फायदा होत आहे. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फायदा संरक्षण क्षेत्रातील ठेकेदारांना झाला आहे. शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर वाढले आहेत. मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे. या युद्धामुळं अमेरिकन ऊर्जा साधनांची निर्यात वाढली आहे. यूरोपियन देश रशियाच्या गॅसला पर्याय पाहत असल्यानं अमेरिकेकडील एलएनजीची मागणी वाढली आहे. यामुळं अमेरिकनं ऊर्जा कंपन्यांचं उत्पन्न वाढलं आहे.
जे देश इराण आणि इस्त्रायल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून दूर आहेत त्यांना याचा फायदा होत आहे. आखातातून जाणारे जहाजवाहतुकीचे मार्ग सुरक्षित नसल्यानं काही देश सुरक्षित ऊर्जा पुरवठादार शोधत आहे. नॉर्वोनं यूरोपला गॅसची निर्यात वाढवली आहे. मागणी वाढल्याानं नॉर्वेकडून अधिक दरानं विक्री केली जात आहे. याशिवाय कॅनडाच्या तेलाची आणि गॅसची मागणी वाढली आहे. ब्राझील आणि गयाना या सारख्या देशांनी देखील तेल निर्यात वाढवली आहे.
दरम्यान, या सर्व देशांना आर्थिक फायदा होण्याचं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ हे आहे. या तेलाची निर्मिती करण्याऱ्या देशांचं उत्पन्न तेलाचे दर वाढल्यानं वाढतात. शस्त्र आणि लष्करी उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न वाढतं.





















