(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, जाणून घ्या भारत बायोटेक काय म्हणाले?
डब्ल्यूएचओने म्हटलय की, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमार्फत भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सिनचा पुरवठा निलंबित केला आहे.
WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, जाणून घ्या भारत बायोटेक काय म्हणाले
Covaxin : जगभरात कोरोना महामारी विरूद्ध युद्ध अजूनही सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांमध्ये अजूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. याबाबत माहिती देताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सीनच्या पुरवठ्यावर संघटनेने बंदी घातली आहे. Covaxin ची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने यावर म्हटले की, जागतिक आरोग्य संघटनेने ही लस प्रभावी असल्याचे म्हटले तसेच याच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याची गरज नाही.
WHO ने कोवॅक्सीनच्या पुरवठ्यावर बंदी
डब्ल्यूएचओने म्हटलय की, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमार्फत भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सिनचा पुरवठा निलंबित केला आहे. जेणेकरून उत्पादक कंपनी सुविधांमध्ये सुधारणा करू शकेल आणि तपासणीमध्ये आढळून आलेले काही दोष दूर करू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने लस मिळविणाऱ्या देशांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु काय कारवाई केली जाईल हे सांगण्यात आलेले नाही. WHO ने म्हटलय की, ही लस प्रभावी आहे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही चिंता नाही, परंतु निलंबनामुळे कोवॅक्सीनचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कोवॅक्सिन लसीच्या प्रभाव आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम नाही
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील कंपनी भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले आहे की, कोवॅक्सिन लसीच्या प्रभाव आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही. कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांना दिलेली लस प्रमाणपत्रे अजूनही वैध आहेत. दरम्यान, कंपनीकडून संबंधित प्रकियांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल.