(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WHO on Omicron Variant : जगभरात प्रत्येकालाच होणार ओमायक्रॉन? WHO चं म्हणणं काय?
WHO on Omicron Variant : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉनची लागण प्रत्येकाला होणार? WHO च्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर. म्हणाले...
WHO on Omicron Variant : सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. ओमायक्रॉनबाबत दिवसागणिक नवनवे खुलासे समोर येत आहेत. कोविड-19 वर रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनीही ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नवा आणि वेगानं पसरणारा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी गंभीर असला, तरिही तो धोकादायक आहे.
ओमायक्रॉन डेल्टाहून कमी धोकादायक असूनही लोक रुग्णालयात का दाख होत आहेत, तसेच या व्हायरसमुळे रुग्णांचा मृत्यू का होत आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. केरखोव्ह म्हणाल्या की, जगभरात ओमायक्रॉनवर होणाऱ्या संशोधनातून आणि निरीक्षणातून निष्पन्न होत आहे की, ओमिक्रॉन रोग प्रतिकारशक्ती कमी करू शकतो. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "नव्या व्हेरियंटवर होणाऱ्या संशोधनावरुन, ओमिक्रॉन व्हेरियंट संसर्ग गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी किंवा लसीकरण न केलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकतो."
जगभरात प्रत्येकाला होणार ओमायक्रॉन
जगात प्रत्येकाला ओमायक्रॉनची लागण होणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. केरखोव्ह म्हणाल्या की, "ओमायक्रॉनचा संसर्ग इतर कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक वेगानं होतो. त्यामुळे सर्वांनाच याची लागण होणं, यामध्ये नवं काहीही नाही. या व्हेरियंटची अगदी सहज सर्वांना लागण होऊ शकते. दरम्यान, त्या हेदेखील म्हणाल्या की, याचा अर्थ असा अजिबात नाही की, जगभरातील प्रत्येकालाच ओमायक्रॉनची लागण होईल. त्या आणखी स्पष्ट करत पुढे म्हणाल्या की, आपण निश्चितपणे जगभरात ओमायक्रॉनचा हाहाकार पाहतोय आणि रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहत आहोत, परंतु यामुळे जगातील सर्व लोकांना संसर्ग होईलच असं नाही."
जगभरातील प्रत्येक देशात पोहोचलाय ओमायक्रॉन
डॉ. केरखोव्ह म्हणाल्या की, "ज्या देशांमध्ये जिनोम सिक्वेसिंगचं विकसित तंत्रज्ञान आहे. त्या देशांमध्ये कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच आतापर्यंत जगातील प्रत्येक देशात पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा सर्वाधिक प्रादुर्भाव ब्रिटन आणि अमेरिकेत झाला आहे. येथे दररोज लाखो कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. याशिवाय इतर अनेक देशांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं निर्बंध, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी स्वत:चं लग्न पुढं ढकललं
- Omicron : ओमायक्रॉन करतो मेंदूवर हल्ला, स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम
- Covid19 Update : ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध उठवले; मास्कची सक्ती नाही, वर्क फ्रॉम होमलाही सुट्टी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha