Jensen Huang : वयाच्या नवव्या वर्षी देश सोडावा लागला, आज अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त संपत्ती, AI Chip चे किंग जेन्सन हुआंग कोण?
Nvidia Corp : जेन्सन हुआंग यांनी AI Chip बनवणाऱ्या एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे.
नवी दिल्ली : लहानपणी आपलं घर सोडावं लागतं, नंतर तो व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर इतरांवर राज्य करतो हे चित्र आपण अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल. पण काही लोकांच्या बाबतीत हे सत्यही आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठीची चिपची (Artificial Intelligence) निर्मिती करणाऱ्या जगातील बलाढ्य अशा एनव्हिडीया (Nvidia) या कंपनीचे मालक असलेल्या जेन्सन हुआंग यांच्याबाबतीत हेच घडलं.मूळच्या तैवानच्या असणाऱ्या हुआंग यांना वयाच्या नवव्या वर्षी आपला देश सोडावा लागला. पण ते थांबले नाहीत. आज त्यांचा जगातल्या सर्वात यशस्वी व्यक्तींच्या यादीत समावेश असून अनेक कंपन्या एआय चिपसाठी त्यांच्या दारात उभ्या आहेत.
अमेरिकन आर्टिफिशियल चिप (AI Chip) निर्माता Nvidia कॉर्पोरेशनचे शेअर्स गेल्या वर्षी 239 टक्क्यांनी वाढले होते आणि यावर्षी 20 दिवसात त्यामध्ये 27 टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचं दिसतंय. या कंपनीची मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळ पोहोचली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये याच वेगाने वाढ होत राहिल्यास येत्या काही दिवसांत ती जेफ बेझोस यांची कंपनी अॅमेझॉनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात श्रीमंत कंपनी ठरेल.
कोण आहेत जेन्सन हुआंग? (Who Is Jensen Huang)
Nvidia ची स्थापना जेन्सेन हुआंग यांनी केली होती. सुरुवातीला या कंपनीने व्हिडिओ-गेम ग्राफिक्स चिप्स तयार केल्या. आज, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये एनव्हिडियाकडून अधिकाधिक चिप्स मिळविण्यासाठी स्पर्धा आहे. याशिवाय सौदी अरेबिया आणि यूएईही कंपनीकडून हजारो चिप्स खरेदी करत आहेत.
हुआंगचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचे बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. 1973 मध्ये त्यांच्या पालकांनी हुआंग यांना अमेरिकेत त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवले. त्यामुळे हुआंग यांचे पुढील शिक्षण अमेरिकेत झाले.
डिनरसाठी भेटले आणि कंपनीची सुरुवात झाली
हुआंग यांनी 1984 मध्ये ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर 1992 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. काही काळ एका कंपनीत काम करून चिप डिझायनिंगचा अनुभवही मिळवला. Nvidia ची स्थापना एका रेस्टॉरंटमध्ये झाली. या ठिकाणी हुआंग त्यांच्या दोन सहकाऱ्यांना डिनरसाठी भेटले होते. त्यानंतर कंपनीची सुरुवात करायची कल्पना समोर आली.
कोरोनाच्या काळात मोठा फायदा
कोरोनाच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. क्रिप्टो बूममुळे, त्याच्या मायनिंगमध्ये चिप्सचा वापर वाढला होता. मात्र त्यानंतर कंपनीच्या समभागांची किंमत दोन तृतीयांश घसरली. आता पुन्हा एआयच्या वाढत्या ट्रेंडमुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा वधारत आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जगभरातील कंपन्या अधिक शक्तिशाली संगणकांची निर्मितीकडे वळत आहेत जे ChatGPT सारखे जनरेटिव्ह AI हाताळू शकतात.
Microsoft सारख्या कंपन्यांना Bing सारखी वैशिष्ट्ये विकसित करण्यास मदत ही Nvidia च्या चिप्सच्या मदतीने झाली. Nvidia कडून अधिकाधिक चिप्स मिळविण्यासाठी मोठ्या टेक कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. सौदी अरेबिया आणि यूएई देखील या कंपनीकडून हजारो चिप्स खरेदी करत आहेत. Tencent आणि Alibaba या चिनी कंपन्या देखील Nvidia च्या दारात उभ्या आहेत.
ही बातमी वाचा: